पॉझिटिव्ह व्यक्तीचे कुटुंबिय गावी आले - चिंता वाढली; कोतीजमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:55 PM2020-05-04T15:55:38+5:302020-05-04T15:58:02+5:30
कडेगाव : मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज तालुका कडेगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे रविवारी समजले .परंतु या ...
कडेगाव : मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज तालुका कडेगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे रविवारी समजले .परंतु या कोरोना बाधित व्यक्तीच्या दोन मुली,पुतण्या व पुतण्याची पत्नी व पुतण्याचा मुलगा असे पाच जण आनाधिकृत प्रवास करून २३ एप्रिल रोजी सकाळी कोतीज गावात आले आहेत.यामुळे चिंता वाढली आहे.
या पाच जणांसह त्यांच्या कोतीज येथील कुटुंबातील अन्य सहा अशा १२ जणांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या ११ व्यक्तींचे 'स्वॅब' तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोतिज गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान कोतीज परिसरामध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.गावामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची दक्षता समिती व पोलीस यांचेकडून विचारपुस केली जात आहे व कसून तपासणी केली जात आहे.संबंधित कुटुंबाचे घर गावाबाहेर वस्तीवर आहे परंतु त्यांचा गावात कोणाशी संपर्क आला आहे का याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान त्या वस्तीवरील शेजारच्या अन्य दोन व्यक्तींना होम कोरंटाइन केले आहे. आरोग्य विभागाच्या सेविका व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वे करीत आहेत. दरम्यान पाचजण मुंबईहुन अनधिकृत प्रवास करून कोतीजमध्ये आले त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
आता खबरदारीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची देखील काळजी घेतली जात आहे. प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे ,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून कोरोना प्रतिबंधासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेत .