कौटुंबिक कलहातून सावर्डेत आईची दोन मुलांसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:27 AM2020-01-13T00:27:00+5:302020-01-13T00:28:06+5:30
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब ...
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे (वय २७), अभिराज बाळासाहेब सदाकळे (७) व हिंदुराज बाळासाहेब सदाकळे (३) अशी मृतांची नावे आहेत.
ही घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. घटनेची नोंद तासगाव पोलिसांत झाली आहे. चंदाराणीचा दहा वर्षांपूर्वी बाळासाहेब याच्याशी विवाह झाला होता. मृत अभिराज व हिंदुराज यांच्यासह त्यांना हर्षद (वय ९) अशी तीन मुले होती. बाळासाहेब हा काही काळ दुसऱ्याच्या किराणा दुकानात कामास होता. सध्या त्याने गावात स्वत:ची बेकरी सुरू केली आहे.
जोडधंदा म्हणून एका चारचाकी गाडीतून शाळेच्या मुलांना सोडण्याचे काम करीत आहे. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; मात्र किरकोळ कारणावरून बाळासाहेब व चंदाराणी यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. बुधवार, दि. ८ रोजी सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर चंदाराणी रागाच्याभरात अभिराज व हिंदुराज यांना घेऊन घरातून निघून गेली.
त्यानंतर घरातील सर्वांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली; मात्र ते सापडले नाहीत. शेवटी बाळासाहेब सदाकळे यांनी शुक्रवार, दि. १० रोजी तासगाव पोलिसांत पत्नी व दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली. रविवारी गावातील लोढे रस्त्यावरील दिलीप पाटील यांच्या पडक्या विहिरीत चंदाराणी, अभिराज व हिंदुराज यांचे मृतदेह आढळून आले.
या घटनेनंतर संपूर्ण सावर्डे गाव सुन्न झाले. तिघांचे मृतदेह पाहताच पती बाळासाहेब, मुलगा हर्षद यांच्यासह सदाकळे कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
हर्षद वाचला...
बुधवारी सायंकाळी हर्षद बाजारात गेला होता. त्याचवेळी घरी भांडण झाले आणि चंदाराणी रागाच्याभरात घरातून निघून गेली. जाताना अभिराज आणि हिंदुराज यांना घेऊन गेली. जर हर्षद घरी असता तर, त्यासही ती घेऊन गेली असती; पण तो वाचला.
हातात हात...
चंदाराणीला आलेला क्षणाचा राग हा तिघांच्या मृत्यूचे कारण ठरला. अभिराज आणि हिंदुराज यांचे मृतदेह एकमेकांच्या हातात हात घालून तरंगत होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.