मिरजेत कोरोनाबाधित म्हणून फलक लावल्याने कुटुंबाला मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:27+5:302021-05-11T04:28:27+5:30
मिरज : मिरजेत बेथलेमनगर येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. कोरोना तपासणी न करताच एका कुटुंबाला ...
मिरज : मिरजेत बेथलेमनगर येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. कोरोना तपासणी न करताच एका कुटुंबाला कोरोनाबाधित असल्याचे जाहीर करून त्यांच्या घरावर कोविड-१९ प्रतिबंधक क्षेत्राचा फलक लावण्यात आला. यामुळे या कुटुंबाला विनाकारण मनस्ताप झाल्याने त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली.
कोरोना चाचणी अहवालात संजय पाटील नावाच्या एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मात्र, नेमके संजय पाटील कोण याची शहानिशा न करता महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेथलेमनगर येथील संजय पाटील यांच्या घरावर कोविड-१९ प्रतिबंधित क्षेत्र असा फलक लावला. कोणाचीही चाचणी झालेली नसताना, घरात कोणीही कोरोना पाॅझिटिव्ह नसताना संजय पाटील व त्यांच्या कुटुंबाला कोरोनाबाधित घोषित करण्यात आल्याने त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
घरावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित म्हणून फलक लावल्याबद्दल विचारणा केली असता तुमचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने हा फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मी कोविड तपासणीच केली नसताना अहवाल कसा आला? अशी विचारणा त्यांनी केली. पाटील यांनी अहवाल मागितल्यानंतर महापालिकेतून घेऊन जा असे सांगण्यात आले. शासकीय कामात अडथळा नको म्हणून संजय पाटील यांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी लावलेला फलक काढण्याचे धाडस केले नाही. कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या अनेक ठिकाणी फलक लावण्यात आलेला नाही. मात्र, कोरोनाबाधित नसताना फलक लावण्याच्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या कृत्याविरोधात तक्रार देण्यासाठी संजय पाटील गांधी चौक पोलिसात गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा महापालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
चाैकट
चुकीचा पत्ता...
संजय पाटील नामक कोरोनाबाधिताच्या अहवालावर बेथलेमनगर असा चुकीचा पत्ता पडल्याने हा गोंधळ झाल्याची माहिती मिळाली. सोमवारी दुपारपर्यंत फलक काढण्यात आलेला नव्हता.