फरारी साधकांची छायाचित्रे प्रसिद्ध करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:59 PM2017-08-20T23:59:25+5:302017-08-20T23:59:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. डॉ. एम. एन. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकांची नावे पुढे आली. सध्या फरारी असलेल्या साधकांची छायाचित्रे राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी केली.
डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन चार वर्षे पूर्ण झाली तरी, सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. याचा जाब विचारण्यासाठी अंनिसतर्फे स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ‘जवाब दो’ हे आंदोलन करण्यात आले. तीनही विचारवंतांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अजूनही मारेकरी सापडत नसल्याने तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप अंनिसच्या पदाधिकाºयांनी केला.
या आंदोलनात प. रा. आर्डे, राहुल थोरात, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. तारा भवाळकर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. नितीन शिंदे, विजयकुमार जोखे, अजय भालकर, फारुख गवंडी, मुनीर मुल्ला, सुनील भिंगे, नामदेव करगणे, अमित शिंदे, अमित ठाकर, डॉ. संजय निटवे, ज्योती आदाटे यांच्यासह जिल्ह्यातील सव्वाशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्यपाल विद्यासागर राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दाभोलकर, पानसरे यांची एकापाठोपाठ एक अशी हत्या झाली. या दोन्ही प्रकरणांचा तपास अपूर्ण आहे. महाराष्टÑात अशा समाजसुधारकांचे खून व्हावेत, ही प्रगतशील महाराष्टÑासाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. कर्नाटक राज्यात कलबुर्गी यांची अशाचप्रकारे हत्या झाली.
तीनही विचारवंतांचे मारेकरी अजूनही फरारी आहेत. राज्य शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करुनही तपासात काहीच प्रगती दिसून येत नाही. डॉ. वीरेंद्र तावडेच्या अटकेनंतर तपास पुढे सरकला नाही. जोपर्यंत मारेकरी सापडत नाहीत, तोपर्यंत समाजातील विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम राहणार आहे.
भरपावसात आंदोलन
सांगली शहरात रविवारी दिवसभर पाऊस सुरु होता. तरीही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी भरपावसात सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. दाभोलकरांच्या मारेकºयांची पत्रके वाटण्यात आली. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्र य शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांच्यातर्फे जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी निवेदन स्वीकारले.