नेर्ले येथील फकिरा गडावर सोमवारी फकिरा जयंती साजरी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:37+5:302021-02-27T04:35:37+5:30
इस्लामपूर : मातंग समाजाच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या आणि ब्रिटिशाविरुद्ध लढताना सामान्य जनतेच्या मदतीसाठी ब्रिटिशांचे खजिने लुटणारे उपेक्षित क्रांतिकारक फकिरा ...
इस्लामपूर : मातंग समाजाच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या आणि ब्रिटिशाविरुद्ध लढताना सामान्य जनतेच्या मदतीसाठी ब्रिटिशांचे खजिने लुटणारे उपेक्षित क्रांतिकारक फकिरा राणोजी साठे यांची जयंती १ मार्चला दुपारी १ वाजता नेर्ले परिसरातील फकिरा गडावर साजरी केली जाणार असल्याची माहिती दलित महासंघाचे प्रमुख प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी दिली.
जागतिक किर्तीचे कलावंत आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या अखिल मराठी साहित्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा ‘फकिरा’ कादंबरीचा हा कर्तृत्वान नायक वाटेगावच्या मातंग समाजातील सुपुत्र होता. वाटेगावातील जोगणीची यात्रा सुरू करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे.
नेर्ले परिसरातील सुळकीचा डोंगर परिसर हा फकिराच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. नेर्ले ग्रामपंचायतीच्या ठरावाने अधिकृत आणि कायदेशीररित्या या सुळकीच्या डोंगराचे नामकरण ‘फकिरा गड’ म्हणून करण्यात आले आहे. फकिरागडावर सर्व समाज घटक आणि सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन वाळवे तालुक्यातील क्रांतिकारकांचे स्मारक उभा करण्याचा मनोदय सकटे यांनी व्यक्त केला. या फकिरा गडावरील सोमवारी होणाऱ्या अभिवादन मेळाव्यास राज्यभरातील मातंग समाजाने यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शंकरराव महापुरे, विकास बल्लाळ, संतोष चांदणे, अनिल आवळे, दिनकर मस्के, अनिल थोरात, रवींद्र बल्लाळ,दिपक मिसाळ, बापूसाहेब बडेकर, दादा बाबर, रमेश सकटे, नेताजी मस्के, पांडुरंग बल्लाळ उपस्थित होते.