‘मार्शल’ श्वानाची थाटात सेवानिवृत्ती, सांगली पोलीस दलातर्फे त्याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:32 PM2018-04-16T23:32:48+5:302018-04-16T23:32:48+5:30
सांगली : जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलातील ‘मार्शल’ हा श्वान नऊ वर्षाच्या सेवेनंतर सोमवारी निवृत्त झाला. पोलीस दलातर्फे त्याचा सत्कार
सांगली : जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलातील ‘मार्शल’ हा श्वान नऊ वर्षाच्या सेवेनंतर सोमवारी निवृत्त झाला. पोलीस दलातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.
मार्शल हा बॉम्बशोधक पथकात काम करीत होता. ४ आॅगस्ट २००९ रोजी तो सेवेत दाखल झाला होता. त्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. कवलापूर (ता. मिरज) येथे २०१६ मध्ये विहिरीतील गाळ काढताना बॉम्ब सापडला होता. तोही मार्शलनेच शोधून दिला होता. त्याची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली. तो अनेक घटनांचा साक्षीदार राहिला. नऊ वर्षाच्या सेवेनंतर तो सोमवारी निवृत्त झाल्याने जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे यांच्याहस्ते मार्शलचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक राजन माने, बॉम्बशोधक पथकाचे उपनिरीक्षक अनिल गायकवाड, हवालदार उदय पोतदार, प्रशांत मांडके, किशोर पवार, तसेच मार्शलला हाताळणारे पोलीस नाईक संजय कोळी व समीर सनवी उपस्थित होते.
मार्शल श्वानाची सेवानिवृत्तीनिमित्त सजविलेल्या जीपमधून मिरवणूक काढली. यावेळी पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे आदी उपस्थित होते.