सांगलीत संस्थानच्या गणपतीला शाही मिरवणुकीने निरोप, दर्शनासाठी तुफान गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:27 PM2022-09-05T12:27:27+5:302022-09-05T12:27:55+5:30
अवघ्या एक किलोमीटर अंतरासाठी लागले तब्बल तीन तास
सांगली : सुमारे पाच तासांच्या विसर्जन सोहळ्यानंतर संस्थानच्या ‘श्रीं’चे रविवारी रात्री विसर्जन झाले. शाही थाटातील विसर्जन सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी सांगलीकर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून थांबले होते. भूतपूर्व संस्थानिक विजयसिंहराजे पटवर्धन व राजलक्ष्मीराजे या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह संस्थानचा गणेशोत्सव साजरा झाला. रविवारी त्याची सांगता झाली. दुपारी विजयसिंहराजे व राजलक्ष्मीराजे यांनी ‘श्रीं’ची आरती केली. त्यावेळी हजारो सांगलीकरांनी बाप्पाचे दर्शन घेतले. चार वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यात अग्रभागी ढोल-ताशांचा अखंड गजर सुरू होता. ध्वजपथकांचे लयबद्ध नृत्य सुरू होते. पांढऱ्याशुभ्र गणवेशातील तरुण-तरुणी भगवे ध्वज उंचावत होेते. राजवाड्यातून निघालेली मिरवणूक पटेल चौक, गणपती पेठेतून गणपती मंदिराकडे निघाली. अवघ्या एक किलोमीटर अंतरासाठी तब्बल तीन तास लागले.
गणपती मंदिरासमोर मिरवणूक काहीवेळ थांबली. ढोल-ताशा पथकांनी मंदिरासमोर रिंगण धरले. त्यानंतर मिरवणूक कृष्णा नदीकडे मार्गस्थ झाली. बाप्पाचे निरोपाचे दर्शन घेण्यासाठी टिळक चौकात तुफान गर्दी झाली होती. पोलिसांनी चारही बाजूंची वाहतूक रोखून धरली होती. आयर्विन पुलावरील वाहतूकही थांबविण्यात आली होती.
रात्री आठच्या सुमारास मिरवणूक सरकारी घाटावर पोहोचली. मिरवणुकीत विजयसिंहराजे आणि राजलक्ष्मीराजे पटवर्धन सहभागी झाले. सोबतच आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, दिगंबर जाधव, जनसुराज्यचे समित कदम, संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर हेदेखील सहभागी झाले होते. घाटावर विजयसिंहराजे यांनी बाप्पांची निरोपाची आरती केली. यावेळी भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात घाट दणाणून सोडला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन झाले.
या सोहळ्यासाठी पोलिसांनी शहरभर बंदोबस्त ठेवला होता. काॅंग्रेस भवनपासून आयर्विन पुलापर्यंत सर्वत्र पोलीस तैनात होते. भाविकांच्या उत्साहाला आवर घालण्याचे काम त्यांना करावे लागले. दोन वर्षांच्या खंडामुळे भाविकांचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. परंतु, कोणताही अनुचित प्रकार न होता शिस्तबद्धरित्या व जल्लोषात विसर्जन सोहळा पार पडला.
पेढ्यांची उधळण
संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पेढ्यांच्या उधळणीची परंपरा भाविकांनी कायम राखली. मिरवणुकीत तरुण मंडळांनी भाविकांना शिरा, पेढे, लाडू, चुरमुरे, फुटाणे अशा प्रसादाचे वाटप केले.