शेततळे बनताहेत मृत्यूचे सापळे, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक
By घनशाम नवाथे | Published: December 9, 2024 12:36 PM2024-12-09T12:36:28+5:302024-12-09T12:36:52+5:30
घनश्याम नवाथे सांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) ...
घनश्याम नवाथे
सांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन दिवसांपूर्वी दोघा चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेततळ्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ देताना सुरक्षेच्या उपाययोजनांची खात्री करणे आवश्यक बनले आहे.
पावसाचे पाणी साठवून ठेवून आपत्कालीन परिस्थितीत ते पिकाला देता यावे, यासाठी शेततळ्यांची संकल्पना राबवली जाते. शेततळ्यातून आवश्यक त्यावेळी पिकांना पाणी देता आल्यामुळे अनेकांना ती वरदान ठरली आहेत. परंतु सुरक्षेअभावी शेततळे म्हणजे मृत्यूचे सापळे बनल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी शेततळ्यात बुडून चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत होत आहे. पट्टीचे पोहणारेदेखील शेततळ्यात पडल्यानंतर बुडून मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
यंदाच्या वर्षात जोंधळखिंडी येथे निवृत्त शिक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मे महिन्यात नेहरूनगर येथे सुटीला आलेल्या दोघा भावांचा मृत्यू झाला. गतवर्षी २०२३ मध्ये बेडगला दोन भावंडे बुडाली. जून २०२३ मध्ये सोनी येथे पोलिस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला. जतमध्ये मोदीमळा येथे मायलेकाचा मृत्यू झाला. प्रत्येक वर्षी अशा दुर्घटना घडताना दिसतात.
शेततळ्यासाठी शासकीय अनुदान मिळते. परंतु शेततळ्याभोवती संरक्षक जाळी बांधणे आवश्यक केले आहे. बरीच शेततळी संरक्षक कुंपणाविना मोकळीच असतात. अनेकांना ती पाहून पोहण्याचा मोह होतो. परंतु आतमध्ये गेल्यानंतर वरती येताना दमछाक होते.
प्लास्टिकवरून पाय घसरत असल्यामुळे कसरत करावी लागते. तळ्यात गाळ साचल्यामुळेही अनेकांचा अडकून बुडून मृत्यू होतो. पोहायला न येणाऱ्यांबरोबर पोहता येणाऱ्यांसाठीही शेततळी पाण्यात पडल्यानंतर धोकादायक ठरू शकतात.
जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळी बनवण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत साडेचार हजारहून अधिक शेततळी आहेत. परंतु यापैकी बरीच शेततळी कुंपणाविना आहेत. तेथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर दुर्घटना टळतील
- शेततळ्यांना कुंपण घातल्यास लहान मुलांना सहजपणे आतमध्ये जाता येणार नाही.
- शेततळ्यात पडल्यानंतर वरती येताना काठ निसरडे असल्यामुळे घसरल्यासारखे होते. त्यामुळे दोरीच्या शिड्या किंवा जाड दोऱ्या जागोजागी टाकून ठेवाव्यात.
- पाण्यात सतत ठेवल्यानंतरही खराब न होणारे ‘फ्लोटर’, इनर, थर्माकोल टाकून ठेवावेत.
- शेततळ्याभोवती सावधानतेचा इशारा देणारे फलक लावावेत.
- शेततळ्यावर शक्य असल्यास जाळी टाकावी. त्यामुळे कचरा साचला जाईल. जाळी पाहून कोणी उतरणार नाही.
जागृती हवी
शेततळे पाहून बऱ्याच जणांना पोहण्याचा मोह होतो. परंतु शेततळ्याची रचनाच वेगळी असते. पट्टीचे पोहणारे आतमध्ये गेल्यानंतर सहजपणे वरती येऊ शकत नाहीत. त्यासाठी शेततळ्यात कोणी जाऊ नये, यासाठी जागृती आवश्यक ठरते. शेतकऱ्यांवर याची मोठी जबाबदारी येते.