चार हजार वर्षांपूर्वीची शेतकरी वसाहत सापडली
By Admin | Published: April 26, 2016 11:56 PM2016-04-26T23:56:33+5:302016-04-27T00:43:23+5:30
संशोधकांना यश : तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडीत अवश्ोष; प्राचीन इतिहासात मोलाची भर
सांगली : प्राचीन इतिहासाचे संशोधक डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे दक्षिण महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची चार हजार वर्षांपूर्वीची वसाहत शोधून काढली आहे. ताम्रपाषाण युगातील म्हणजेच चार हजार वर्षांपूर्वीची मृद्भांडी, मातृकामूर्ती, लहान मुलांची खेळणी यांचे अवशेष मिळून आले आहेत. या शोधामुळे जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात मोलाची भर पडली आहे.
ताम्रपाषाण युग हे आद्य शेतकऱ्यांचे युग मानले जाते. इसवीसनपूर्व २००० ते इसवीसनपूर्व ९०० या काळात हे युग अस्तित्वात होते. या काळात माणूस प्रामुख्याने शेती करू लागला होता. पशुपालन हा त्याचा जोडव्यवसाय होता. त्याची घरे गोलाकार आणि आयताकृती होती. माणसाच्या मृत्यूनंतर होणारा त्यांचा दफनविधीही वैशिष्ट्यपूर्ण होता. प्रौढांना घराच्या अंगणात दफन करीत, तर लहान मुलांना मातीच्या भांड्यात घालून दफन करीत. या काळात कुंभारकला ही सर्वोच्च टोकाला पोहोचली होती. या काळातील मानव कुंभारकलेत निष्णात होता. त्यामुळे त्याने बनविलेली नक्षीदार भांडी आजही आढळून येतात.
ताम्रपाषाण युगाची ही वैशिष्ट्ये दाखविणारी वसाहत तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावात अग्रणीकाठी शेतात डॉ. निरंजन कुलकर्णी यांना नुकतीच आढळून आली आहे.
आजवर दक्षिण महाराष्ट्रात सातवाहन कालातील अवशेष आढळून आले आहेत. मात्र, त्यापूर्वीचे अवशेष आढळून येत नव्हते. सातवाहनपूर्व काळातील इतिहास आजवर अज्ञातच होता. मात्र, डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या संशोधनामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सातवाहनपूर्व काळातील मानवी वसाहतींचा शोध लागला आहे. आजवर भीमा नदीच्या खोऱ्यात आणि कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात ताम्रपाषाण काळातील अवशेष मिळाले होते. मात्र, या दोन्ही प्रदेशांचा सहसंबंध अज्ञात होता. सिद्धेवाडी येथे सापडलेल्या ताम्रपाषाणयुगीन अवशेषांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तत्कालीन दुवा निश्चित झाला आहे.
सिद्धेवाडी येथे डॉ. कुलकर्णी यांना ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्ये असणाऱ्या लाल रंगाच्या भांड्याचे तुकडे मिळाले असून, त्यावर काळ्या रंगाने नक्षीकाम केले आहे. एक स्त्रीप्रतिमाही मिळाली आहे. त्याशिवाय खेळण्याचे काही अवशेष, सुक्ष्मास्त्रे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गारगोटीचे दगडही अग्रणी नदीच्या काठावर मिळाले आहेत.
या शोधामुळे दक्षिण महाराष्ट्रात विशेषत: सांगली जिल्ह्यात सुमारे चार हजार वर्षांपूर्वी नांदत असलेल्या आद्य शेतकऱ्यांच्या वसाहतीची माहिती मिळाली आहे. जिल्ह्याच्याच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात या शोधामुळे भर पडणार आहे. याठिकाणी उत्खनन करून प्राचीन इतिहासाचा अधिक अभ्यास करण्याचा मानस डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
निरंजन कुलकर्णी यांच्याकडून १०३ ठिकाणांचा शोध
डॉ. निरंजन कुलकर्णी हे प्राचीन इतिहासाचे गाढे अभ्यासक असून, त्यांनी डेक्कन कॉलेजमधून पुरातत्व विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. सध्या ते हातकणंगले येथे अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णेच्या उर्ध्व खोऱ्यातील प्राचीन वसाहतींचा ते गेली अनेक वर्षे अभ्यास करीत आहेत. आजवर त्यांनी सातवाहनकालीन सुमारे १०३ ठिकाणे शोधली आहेत. या संशोधनासाठी त्यांना भारतीय इतिहास अनुसंधान केंद्राचे साहाय्य लाभले आहे.