शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 06:02 PM2023-08-03T18:02:53+5:302023-08-03T18:03:29+5:30
अशोक पाटील इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास ...
अशोक पाटील
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास आले. आता प्रत्येकाने वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण सुरु केले आहे. परंतु राज्यातील बदलणाऱ्या राजकीय घडामोडीत या नेत्यांची वाताहत होत चालली आहे.
महाराष्ट्रात दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. कांदा आंदोलनानंतर जोशी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात राजू शेट्टी (कोल्हापूर), रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील (सांगली) यांनी ऊसदर आंदोलनच्या माध्यमातून शेतकरी संघटनेला उभारी दिली. त्यानंतर जोशीप्रणीत शेतकरी संघटनेत फूट पडली. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नव्याने स्थापना केली. या संघटनेत सदाभाऊ खोत यांना सेनापतीपद देण्यात आले होते.
रघुनाथदादा पाटील यांनी शेट्टी यांचे नेतृत्व झुगारत आजअखेर शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर कायम ठेवला. दुसरीकडे सत्तेच्या मोहापायी शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावली. शेट्टी सुरुवातीस भाजपसोबत आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन करून भाजपशी सोबत केली. दोघांनी आपापल्या संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या. स्वतःची वाताहत करून घेतली. आता शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. खोत यांनी भाजपचा अजेंडा रेटण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे.
रघुनाथदादा यांनी शेतकरी संघटना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या छत्रछायेखाली नेऊन ठेवली. आगामी काळात शेट्टी व खोत यांच्या संघटनांना शह देण्याच्या प्रयत्नात ते आहेत. या सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला राहिले, आता संघटनेसह त्यांचीही वाताहत सुरू आहे.
शेतकरी संघटनेची वाताहत २००४ पासूनच सुरू आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच लढणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या भूमिकेतून राजकारण करणार आहोत. त्यांच्या आदेशाने आगामी निवडणुका लढविण्याचा विचार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट रोजी पुन्हा राव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना