३० गुंठ्यांत ८ लाख रुपयांचे टोमॅटो; मिरजमधील शेतकऱ्यानं 'करून दाखवलं'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:13 PM2021-11-18T13:13:20+5:302021-11-18T16:07:26+5:30

लिंगनूर : बाजारपेठेच्या मागणीनुसार आधुनिक प्रयोगशील शेती करत ३० गुंठ्यांत आठ लाखाचे टोमॅटो घेऊन लिंगनूर (ता. मिरज ) येथील ...

A farmer in Miraj taluka took eight lakh tomatoes in 30 guntas | ३० गुंठ्यांत ८ लाख रुपयांचे टोमॅटो; मिरजमधील शेतकऱ्यानं 'करून दाखवलं'

३० गुंठ्यांत ८ लाख रुपयांचे टोमॅटो; मिरजमधील शेतकऱ्यानं 'करून दाखवलं'

googlenewsNext

लिंगनूर : बाजारपेठेच्या मागणीनुसार आधुनिक प्रयोगशील शेती करत ३० गुंठ्यांत आठ लाखाचे टोमॅटो घेऊन लिंगनूर (ता. मिरज) येथील बाबासाहेब म्हेत्रे या तरुण शेतकऱ्याने धडा घालून दिला आहे.

म्हेत्रे यांनी दहावीनंतर पुढे शिक्षण न घेता शेतीतूनच प्रगती साधण्याचे ठरवून मागील दहा वर्षांपासून भाजीपाला उत्पादन सुरू केले. यावर्षी ३० गुंठ्यांत टोमॅटोची लागवड केली. ऑगस्टमध्ये मल्चिंग पेपर टाकून ४.५ फूट बाय दोन फुटाचे बेड तयार केले. साधारणत: दोन फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले. ५०-५० टक्के रासायनिक व सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. या ३० गुंठ्यांत ८०० कॅरेट टोमॅटोचे उत्पादन झाले असून अजून २०० कॅरेट उत्पादन अपेक्षित आहे.

अहमदाबाद, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होती. प्रतिकॅरेट १००० ते ११५० रुपये दर मिळाला. आजही या टोमॅटोचे उत्पादन सुरू आहे. बियाणे, मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोची झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी ३० गुंठ्यांत ८० हजार रुपयांचा खर्च आला.

पिकात सातत्य

बाबासाहेब म्हेत्रे यांची चार एकर जमीन आहे. दुधी भोपळा, ढबू मिरची, टोमॅटो, दोडका, कारली आदी भाजीपाला पिकात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे.

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीवर लक्ष केंद्रित करून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास नोकरीपेक्षा लाभदायी ठरते. सुशिक्षित तरुणांनी नोकरी न मिळाल्यास हताश न होता शेतीकडे वळावे . - बाबासाहेब म्हेत्रे, लिंगनूर

Web Title: A farmer in Miraj taluka took eight lakh tomatoes in 30 guntas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.