सांगलीतील खुंदलापूर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By संतोष भिसे | Published: May 28, 2024 05:05 PM2024-05-28T17:05:30+5:302024-05-28T17:05:39+5:30
आनंदा सुतार वारणावती : खुंदलापूर (ता. शिराळा) येथे गव्याच्या हल्ल्यात ठकुजी गंगाराम शेळके (वय ६५) हा शेतकरी गंभीर जखमी ...
आनंदा सुतार
वारणावती : खुंदलापूर (ता. शिराळा) येथे गव्याच्या हल्ल्यात ठकुजी गंगाराम शेळके (वय ६५) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. चांदोली अभयारण्याच्या सीमेवर खातवाड नामक खासगी मालकीच्या शेतात आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ठकुजी शेळके जनावरे चरायला सोडण्यासाठी गेले असता पाठीमागून आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.
गव्याने शेळके यांना शिंगावर उचलून शेतात फेकून दिले. त्यात त्यांच्या पाठीत खोल जखम झाली आहे. हल्ल्यावेळी शेजारीच घरात काम करीत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळून गेला. जखमी शेळके यांना खासगी वाहनातून मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा पाटील यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. पोलिस पाटील धाकलू गावडे यांनी गव्याच्या हल्ल्याची माहिती वन विभागास दिली. त्यानंतर वनपाल व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठांना कळविले. वन विभागाने पुढील उपचारांसाठी शासकीय वाहनातून कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठविले.
दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच माजी सरपंच वसंत पाटील, सावळाराम पाटील, राम माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गव्याच्या हल्ल्यामुळे खुंदलापूर व मणदूर परिसरात भितीचे वातावरण आहे. खुंदलापूर परिसरात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही. जखमी शेळके यांना खासगी वाहनातून मणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले.