जत तालुक्यातील ७० गावांतील शेतकरी पीक विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:30+5:302021-03-04T04:48:30+5:30
जत : जत तालुक्यातील शेगाव, उमदी व डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सुमारे ७० गावांतील शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागातील आधिकाऱ्यांच्या ...
जत : जत तालुक्यातील शेगाव, उमदी व डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सुमारे ७० गावांतील शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागातील आधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याच्या निषेधार्थ दि. ३ मार्च रोजी जत तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, जत तालुका कृषी विभागाच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे आणि चुकीच्या प्रजन्य मापक यंत्रामुळे प्रत्यक्षात नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. जत तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघांतील शेतकऱ्यांचे सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपये इतके आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून काहीच नुकसानभरपाई मिळालेली नाही. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मनमानी करून काही ठराविक शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत. प्रत्यक्षात ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे केले नाहीत. यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तोंडी तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ दि. ३ मार्च रोजी जत तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
या लाक्षणिक उपोषणात जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता जाधव, ॲड. प्रभाकर जाधव, सोमनिंग बोरामणी, सोमनिंग बसरगाव, संजय बरडोल, मनोहर पवार, सिद्धाप्पा कत्ते, बसवराज बिराजदार, ज्ञानदेव माळी, नानासाहेब शिंदे, महादेव शिंदे, दादासाहेब वाघमोडे इत्यादी शेतकरी सहभागी होणार आहेत.