महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:15+5:302020-12-15T04:42:15+5:30
विटा : विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई मध्ये संपादित होणाऱ्या शेतजमिनींची संयुक्त मोजणी करावी, या ...
विटा : विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई मध्ये संपादित होणाऱ्या शेतजमिनींची संयुक्त मोजणी करावी, या मागणीसाठी खानापूर पूर्व भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संयुक्त मोजणी करून नुकसानभरपाई मिळेपर्यंतचा लढा सुरू ठेवून संघर्ष करण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी तामखडी (ता. खानापूर) येथे अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या बैठकीत दिला.
विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम खानापूर पूर्व भागात सुरू आहे. या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. परंतु, कोणतीही पूर्वसूचना अथवा नुकसानभरपाई न देता जमिनी संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख व सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लढा सुरू ठेवला आहे.
शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहण २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, महामार्गबाधित शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र, बांधकाम, फळझाडे, कूपनलिका व पाईपलाईन यांचा संयुक्त कमिटीव्दारे सर्व्हे करून मूल्यांकनाच्या निवाडा नोटीस तातडीने द्याव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन केले आहे. त्यामुळे याची दखल घेत बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राचे राजपत्रही जाहीर झाले. परंतु, अद्यापपर्यंत पळशी व करंजे ही दोन गावे वगळता सुलतानगादे, हिवरे, बेणापूर, खानापूर, ऐनवाडी, जखीनवाडी, रेवणगाव, धोंडगेवाडी, रेणावी व विटा या गावांच्या शेतजमिनींचा कोणताही सर्व्हे झाला नाही.
या बैठकीस गोपीनाथ सूर्यवंशी, भानुदास सूर्यवंशी, दिगंबर कांबळे, सुनील हसबे, महानंद हसबे, वसंतराव यादव, प्रदीप मुळीक, सचिन जादव, रविकांत जाधव, जयराम जाधव, दौलत भगत, शहाजी भगत, विश्राम सूर्यवंशी, जगन्नाथ मुळीक उपस्थित होते.
फोटो - १४१२२०२०-विटा-शेतकरी बैठक
फोटो ओळ : विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गाच्या बाधित क्षेत्राच्या संयुक्त मोजणीसाठी तामखडी (ता. खानापूर) येथे आयोजित बैठकीत उमेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.