सांगली जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोरदार पाऊस, पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:15 PM2024-08-20T16:15:12+5:302024-08-20T16:21:43+5:30

पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह धो-धो

Farmers are satisfied with the third consecutive heavy rain in Sangli district | सांगली जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोरदार पाऊस, पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान

सांगली जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोरदार पाऊस, पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान

सांगली: जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी सोमवारी पावसाने हजेरी लावली. वाळवा, शिराळा, मिरज पश्चिम भागासह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगांच्या गडगडाटासह धो-धो पाऊस झाला. जोराच्या पावसाने शेतांसह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते, ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. गेल्या तीन दिवसांपासून वातावरण बदलले. त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. वाळवा, शिराळा तालुक्यासह पश्चिम भागातील काही गावांत ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी जोरदार पाऊस झाला. एकसारखा तासभर पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच-पाणी झाले.

आटपाडी तालुक्यात धुव्वांधार पाऊस झाला. तालुक्यात खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत, त्यामुळे पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान व्यक्त केले जात आहे. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात काही गावात पावसाने हजेरी लावली. सांगली, मिरज शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

आटपाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक ४१.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दि. १९ ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ५.४, जत २, खानापूर ८.१, वाळवा ३.९, तासगाव २९, शिराळा २.४, आटपाडी ४१.९, कवठेमहांकाळ १०.४, पलूस १२.४, कडेगाव ५.१.

Web Title: Farmers are satisfied with the third consecutive heavy rain in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.