कोकरुड येथे शेतकºयास पोलिसाची मारहाण--गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 09:49 PM2017-09-13T21:49:16+5:302017-09-13T21:50:02+5:30
कोकरुड : येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. माळेवाडीतील शेतकरी केरू महादेव जाधव (वय ७८) यांनी फिर्याद दिल्यानंतर तसेच ग्रामस्थांच्या दबावानंतर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारणाच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी कोकरुड व माळेवाडी येथे बंद पुकारण्यात आला आहे.
माळेवाडी-कोकरुड येथील वयोवृध्द शेतकरी केरू महादेव जाधव हे कोकरुड पोलिस स्टेशनच्या लगत असणाºया माळावर बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास जनावरे चरावयास घेऊन गेले होते. जनावरे चरत असताना पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांनी जाधव यास साहेब बोलावत असल्याचे सांगितले. त्यानंतर केरू जाधव पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी भगवान शिंदे यांनी ‘ये थेरड्या, इकडे जनावरे का चरायला आणला आहेस’ असे म्हणत त्याच्या कानशिलात लगावल्या. यामुळे जाधव जमिनीवर कोसळले.
हा प्रकार काही ग्रामस्थांनी पाहिला व त्यांनी गावात याबाबतची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कोकरुड व माळेवाडी येथील सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याच्या आवारात धाव घेतली. त्यावेळी जाधव हे चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले. यावर लोकांचा विश्वास न बसल्याने जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता, शिंदे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. यामुळेच आपण बेशुध्द पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर शिंदे यांच्याकडे विचारणा केली; मात्र त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली नसल्याचे सांगितले. शिंदे हे खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी दोन तास घेराव घातल्यानंतर शिंदे यांच्यावर त्यांच्याच पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी काही ग्रामस्थ म्हणाले, शिंदे यांनी कोकरुड येथील चौगुले गल्लीतील दोन महिलांना आठवड्यापूर्वी असेच कारण नसताना मारहाण केली आहे. कोकरुड पोलिस ठाण्याला देशमुख कुटुंबियांनी मोफत जागा दिली आहे. ही जागा पोलिस ठाण्याच्या मालकीची नाही. पोलिस ठाण्याच्या बाहेरील जागा कोकरुड गावची आहे. यामध्ये शिंदे यांचा काहीही संबंध नाही. मग मोकळ्या जागेत गुरे चरल्यानंतर कोणाला मारण्याचा, शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही उपस्थित केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १४ रोजी कोकरुड व माळेवाडी बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल घोडे, माजी तालुकाप्रमुख संजय घोडे, माजी सरपंच संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.