राष्ट्रीय महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:29 AM2021-02-11T04:29:30+5:302021-02-11T04:29:30+5:30
खानापूर घाटमाथ्यावर गुहागर-विजापूर महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनी संपादन न करता आणि कोणताही मोबदला न देता काम सुरू ...
खानापूर घाटमाथ्यावर गुहागर-विजापूर महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनी संपादन न करता आणि कोणताही मोबदला न देता काम सुरू केले होते. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांना संघटित करून नुकसानभरपाईसाठी लढा उभा केला होता. या लढ्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागणी मान्य करीत संयुक्त मोजणीचा प्रस्ताव तयार केला.
त्यानुसार, बुधवारी खानापूर तालुक्यातील रेवणगाव, ऐनवाडी, धोंडगेवाडी परिसरात संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नसल्याने अनेक शेतकरी गैरहजर होते.
याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, सचिव सचिन जाधव, दाजी पवार, विश्वास सूर्यवंशी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने ऐनवाडी येथे जाऊन पाहणी केली.
त्यानंतर, बाधित शेतकरीही तेथे एकत्रित आले. त्यांनी याबाबत महामार्ग व भूअभिलेख अधिकाऱ्यांना घेराव घालून याबाबतची माहिती मागितली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरून संयुक्त मोजणीची प्रक्रिया रोखून धरली.
फोटो - १००२२०२१-विटा-हायवे ०१ किंवा ०२ : ऐनवाडी (ता. खानापूर) येथे राष्ट्रीय महामार्गाची संयुक्त मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी रोखून अधिकाऱ्यांना घेराव घातला.