कुंडल येथे २३ मार्चला पाच जिल्ह्यांची शेतकरी परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:28+5:302021-02-23T04:40:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पाच जिल्ह्यांची शेतकरी परिषद कुंडल येथे २३ मार्चला घेण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पाच जिल्ह्यांची शेतकरी परिषद कुंडल येथे २३ मार्चला घेण्यात येणार आहे. सांगलीत संयुक्त शेतकरी, कामगार मोर्चाच्या बैठकीत तसा निर्णय झाला. आमदार अरुण लाड व पुरोगामी विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली.
बैठकीचे आयोजक उमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू असताना पश्चिम महाराष्ट्रात मात्र विशेष हालचाली नाहीत. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी कृती कार्यक्रम राबवायला हवा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, कायद्यांविरोधात व्यापक परिषद घेऊन जनजागर करायला हवा. यामध्ये शेतकऱ्यांसोबतच तरुणांनाही सहभागी करून घेऊ. हा लढा सांगलीपुरता मर्यादित न ठेवता पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूरच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू. आमदार लाड यांनी कुंडलमध्ये परिषद आयोजनासाठी पुढाकार घेतला. शहीद भगतसिंह यांच्या स्मृतिदिनी २३ मार्चला परिषद घेण्याचे ठरले.
तत्पूर्वी पाच जिल्ह्यांतील ५०० तरुणांना कायद्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या जिल्ह्यातील १००० गावांत सभा घेतल्या जाणार आहेत. पुस्तके, प्रसिद्धीपत्रके या माध्यमातून कृषी कायद्यांतील धोके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जातील.
चर्चेत डॉ. उदय नारकर, डॉ. सुभाष जाधव, व्ही.वाय. पाटील, ॲड. के.डी. शिंदे, धनाजी गुरव, माणिक अवघडे, ॲड. कृष्णा पाटील, जे.एस. पाटील यांनीही भाग घेतला. बैठकीला महेश माने, दिगंबर कांबळे, अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.
चौकट
परिषदेला दिल्ली आंदोलनातील नेते
क्रांतिभूमी असलेल्या कुंडल येथील परिषदेला दिल्ली आंदोलनातील नेत्यांना बोलावण्याचा प्रयत्न असल्याचे उमेश देशमुख म्हणाले. डाॅ. अशोक ढवळे, नरेश टिकैत किंवा योगेंद्र यादव यांना आणण्याचा प्रयत्न असेल.