मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल : ‘झिरो बजेट’ तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:59 PM2019-02-05T22:59:48+5:302019-02-05T23:05:01+5:30
मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत.
लिंगनूर : मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत. रासायनिक व सेंद्रिय शेतीला फाटा देत त्यांनी ‘झिरो बजेट’ शेतीतून भरघोस उत्पादन घेतले आहे.
रसायनमुक्त शेतीची संकल्पना मांडणारे डॉ. सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास शेट्टी यांनी झिरो बजेट शेतीची सुरुवात केली आहे. झिरो बजेट शेतीमुळे रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर टाळून त्यांनी केवळ जीवामृत आणि गोमूत्र, शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा जास्त उत्पादन होऊन त्यांच्या उत्पादन खर्चात ८० टक्केची बचत झाली आहे. केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या रसायनमुक्त द्राक्षांना व्यापाºयांकडून जास्त दराने मागणी होऊ लागली आहे. याच संकल्पनेवर टोमॅटो, दोडका, अन्य भाजीपाला, गहू, शाळू, हरभरा अशी पिके घेतली असून, रसायनमुक्त शेतीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. यातून प्रेरणा घेत श्रीकांत मगदूम (लिंगनूर), सुरेश चौगुले, सागाप्पा पाटील (खटाव), पुनीत विवेकी यांनीसुद्धा दर्जेदार द्राक्षे पिकवली आहेत.
चार एकरासाठी दीड लाख
गतवर्षी ४ एकर द्राक्षबागेसाठी ७ लाख इतका उत्पादन खर्च झाला होता. मात्र यंदा नैसर्गिक विषमुक्त शेतीमुळे १ ते दीड लाख इतकाच खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातील रक्कमही येणाºया नफ्यात आल्याने एकूण नफ्यात ८० टक्केनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एक कणही रासायनिक खत अथवा सेंद्रिय खताचा वापर केलेला नाही.
देशी व गीर गाईची मागणी
मिरज पूर्व भागातील लिंगनूर, आरग, खटाव परिसरातील द्राक्षबागायतदारांचा नैसर्गिक शेतीकडे ओढा वाढला आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांना कोणत्याही रसायनिक औषधे व खताशिवाय देशी गाईचे शेण, मूत्रापासून बनवलेल्या जीवामृतावर द्राक्षबागेचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. तसेच गाईपासून दूध तर मिळतेच, पण गोमूत्राचा औषध म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे देशी व गीर गार्इंना मागणी वाढली आहे.
शेती करताना अवाजवी उत्पादन खर्च व उत्पादनास मिळणाºया कमी भावामुळे शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकºयांनी डॉ. सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या नैसर्गिक, रसायनमुक्त शेतीचा अवलंब केल्यास शेतकºयांना फायदेशीर ठरेल.
- सुहास शेट्टी, द्राक्ष उत्पादक शेतकरी