शेतकऱ्यांना छळू नका; अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार पडळकर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 12:38 PM2021-12-07T12:38:16+5:302021-12-07T12:39:24+5:30
पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका.
आटपाडी : राज्यातील ज्या मतदारसंघातील आमदार सत्तेत आहेत, त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडली आहेत. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे शेतकरी हैराण आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना छळू नका. तोडलेली कनेक्शन तत्काळ जोडा, नाहीतर वीज विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
आटपाडी येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माेर्चात माजी मंत्री सदाभाऊ खाेत, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, जयवंत सरगर, राहुल खरात, भाऊसाहेब मेनकुदळे, आदी सहभागी झाले हाेते. यावेळी पडळकर म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी चुकीची बिले दिली आहेत. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांचे कनेक्शन तोडून त्यांना त्रास देऊ नका. शेतकऱ्यांची वीज बिले शंभर टक्के माफ केली पाहिजेत. आमच्याकडे राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या भागातील वीज कनेक्शन जोडल्याची यादी आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, चुकीची बिले देऊन कारवाई करणाऱ्या या विभागाबाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न मांडून धारेवर धरू. आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना आणखी अपमानित करू नका.
आंदाेलनात विष्णू अर्जुन, आप्पासाहेब काळेबाग, बंडोपंत देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
पालकमंत्र्यांचे ऐकून अडचणीत येणार!
पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका. तुम्हाला आमदार किंवा मंत्री पगार देत नाहीत. सामान्यांच्या खिशातील करातून पगार मिळतो. मी अजून ३० वर्षे तरी राजकारणात राहीन. खोटे उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुटी देणार नाही. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास विजेच्या खांबावर चढणे आणि उतरणे कठीण करू, असा इशारा पडळकर यांनी दिला.
वीज बिलाचा घोळात घोळ!
आंदोलनात एका शेतकऱ्याने गेल्या महिन्यात २८ हजार रुपये वीज बिल भरले तरी या महिन्यात पुन्हा ३२ हजार रुपये वीज बिल आल्याचे सांगितले. तीन अश्वशक्ती पंपाला पाचचे आणि पाच अश्वशक्ती क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल दहा अश्वशक्तीची बिले दिल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.