हमालाची शेतकरी, चालकास मारहाण
By admin | Published: January 10, 2016 12:55 AM2016-01-10T00:55:19+5:302016-01-10T01:01:26+5:30
सांगलीतील घटना : टेम्पोवर दगडफेक
सांगली : किरकोळ वादातून हमालाने शेतकरी व चालकास शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. मोहन नाना सरगर (रा. सांगली) असे या हमालाचे नाव आहे. त्याने टेम्पोवर दगडफेकही केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी अनिल तात्यासाहेब बिसले (वय ३२, रा. कोसारी, ता. जत) व टेम्पोचालक राजेश हरिश्चंद्र पवार (२५, शेगाव, ता. जत) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. अनिल बिसले यांची कलिंगडची शेती आहे. शुक्रवारी त्यांनी दिवसभर शेतातील कलिंगड काढली होती. कलिंगड विक्रीसाठी विष्णूअण्णा फळमार्केटमध्ये आणण्यात आली होती. यासाठी त्यांनी राजेश पवार यांचा टेम्पो (क्र. एमएच १० झेड ४५१४) भाड्याने ठरविला होता. बिसले व पवार दोघेही कलिंगड घेऊन रात्री साडेअकरा वाजता ते मार्केटमध्ये आले. कलिंगड उतरत असताना एक दगड कॅरेटला लागला. याठिकाणी हमाल मोहन सरगर झोपला होता. त्याला राग आला. त्याने कॅरेटला दगड कोणी मारला, अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. सरगरने बिसले व पवारला मारहाण केली. त्यानंतर टेम्पोवर दगडफेक करुन पुढील बाजूची काच फोडली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने फळ मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तोपर्यंर सरगर तेथून पसार झाला होता. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)