शेतकऱ्यांनी मैदान सोडलेलेच नाही! अजित नवले : सांगलीत किसान सभेचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:41 PM2018-04-30T23:41:39+5:302018-04-30T23:41:39+5:30
सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण आता दोन महिने उलटले तरी, या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. भाजपने पुन्हा आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली असली तरी, शेतकऱ्यांच्या पोरांनी अजून मैदान सोडलेले नाही, अशा शब्दात सरकारवर हल्ला चढवत, शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती दिनापासून पुन्हा आंदोलन हाती घेत असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस अॅड. अजित नवले यांनी सोमवारी सांगितले.
सांगलीत मराठा सेवा संघाच्या सभागृहात किसान सभेचा मेळावा झाला, यावेळी नवले बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य सचिव दिगंबर कांबळे, कमिटी सदस्य सुभाष निकम, अरुण माने उपस्थित होते.
नवले म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी संप व लाँग मार्चवेळी सरकारने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधीही मागून घेतला. पण आता दोन महिने झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. कर्जमाफीच्या निकषात बदल केले, पण सरसकट कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. अजून २०१७ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना नोकºया नाहीत. शेती परवडत नाही, म्हणून तोही आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची ही हतबलता संपवून, त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी किसान सभेने लढा हाती घेतला. सरकारच्या धोरणाचीच तिरडी उचलण्याचे आंदोलन केले. ४० हजार शेतकºयांनी लॉँग मार्चमध्ये सहभाग घेत एल्गार पुकारला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली. पण आंदोलन थंडावताच पुन्हा सरकारने रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. शेतकºयांचा विश्वासघात करणाºया सरकारविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकºयांच्या पोरांनी अजून मैदानातून पळ काढलेला नाही. येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दूध दर यासह विविध मागण्यांसाठी यादिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला घेराव घालणार आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील शेतकºयांनी देवस्थान जमिनीचा प्रश्न मांडला. शासनाने या जमिनी काढून घेण्याचा डाव आखला असून त्याविरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धारही मेळाव्यात केला. या मेळाव्याला खंडेराव वाघचौरे, गुलाब मुलाणी, गवस शिरोळकर, सुदर्शन घेरडे, रियाज जमादार, सुधीर गावडे, कुमार सकळे आदी उपस्थित होते.
लबाडांना : ग्लास भरून दूध
दुधाला लिटरमागे २७ रुपये दर मिळावा, यासाठी ३ ते ९ मेदरम्यान मोफत दुधाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गुजरातहून मोदी ग्लास मागवावेत. हे ग्लास बाहेरून ५६ इंचाचे दिसत असले तरी, आतमध्ये ५६ थेंबही दूध मावत नाही. या लबाडांना ग्लास भरून दूध दिले तरी ते सुधारणार नाहीत, असा टोलाही नवले यांनी लगाविला.