डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:43 PM2017-11-06T17:43:11+5:302017-11-06T17:48:29+5:30

मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Farmers Havelandil in Sangli area, due to pomegranate, have suffered heavy casualties | डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

डाळिंब कुजू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, सांगली परिसरातील शेतकरी हवालदिल

Next
ठळक मुद्देमाडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी परिसरातील चिंताजनक चित्रनुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

माडग्याळ ,दि.  ०६ :  मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


पूर्व भागातील माडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी आदी भागात कायमस्वरुपी दुष्काळाशी दोनहात करणारे शेतकरी आपले उत्पन्न वाढावे, आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बॅँक, प्रसंगी सावकाराकडून कर्जे काढून बागायत शेतीसाठी प्रयत्न सतत करीत असल्याचे चित्र असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हाता-तोंडाशी आलेली डाळिंब पिके कुजू लागली आहेत. कितीही औषध फवारणी करुनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना कुजलेली डाळिंबे काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सध्या डाळिंबाचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या भागात सुमारे दोन हजाराच्या वर (हेक्टर) डाळिंब क्षेत्र असल्याचे येथील पांडुरंग सावंत या शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले असले तरी, अद्याप या भागातील बागांचे पंचनामे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.


या भागातील शेतकऱ्यांनी चांगले वातावरण म्हणून जून-जुलै महिन्यात बागांची छाटणी घेतली. आॅगस्ट महिन्यात औषध फवारणी, मशागतीची कामे केली व बहर धरला. नोव्हेंबर महिन्यात फळांची विक्री सुरु होते. मात्र हाता-तोंडाशी आलेल्या डाळिंब बागांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

रात्रंदिवस कष्ट करुन शेतकऱ्यांनी बागा जोमात वाढविल्या. मात्र दर अत्यंत कमी सुरु असल्याने, बागेचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या भागातील नुकसानग्रस्त बागांची पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संजय निकम या शेतकऱ्यांने केली आहे.

व्यापारी कर्नाटकातून डाळिंबे खरेदी करीत आहेत. येथील डाळिंब खराब असल्याने दर कमी आहे. मात्र कनमडी, अटकेरी, कोहलगी आदी भागात फळे चांगली असल्याने व्यापारी चांगल्या फळांकडे वळला आहे. बिळूर, सोन्याळ, जाडरबोबलाद आदी भागात डाळिंब व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत.

या भागातील पांडुरंग सावंत, सीताराम माळी, दगडू माळी, संजय निकम आदी शेतकऱ्यांच्या बागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते. त्वरित पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Farmers Havelandil in Sangli area, due to pomegranate, have suffered heavy casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.