आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 04:28 PM2022-11-18T16:28:34+5:302022-11-18T16:29:01+5:30

उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार

Farmers in Sangli district received Rs 35 crore for heavy rains | आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले

संग्रहित फोटो

googlenewsNext

सांगली : गेल्यावर्षी अर्थात डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे दिला होता. या पावसामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली होती. या पिकांची नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडे आली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपये जमा केले आहेत.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. या दरम्यान, ३८४ गावांतील पिके बाधित झाली होती. सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तातडीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण केले.

पंचनामे पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला होता. ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची जिल्ह्यासाठी ३८ कोटी १ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. या निधीपैकी ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

तालुकानिहाय गतवर्षी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई वाटप

तालुका प्राप्त निधी शेतकऱ्यांना वाटप निधी
मिरज९ कोटी ६१ लाख९ कोटी ५६ लाख
तासगाव१३ कोटी १९ लाख१२ कोटी ५७ लाख
वाळवा५ लाख ९२ हजार५ लाख ९० हजार
शिराळा५५ हजार५५ हजार
पलूस३ कोटी ३५ लाख३ कोटी १३ लाख
कडेगाव१ लाख ९१ हजार१ लाख ९१ हजार
खानापूर३ लाख ३० हजार३ लाख ३० हजार
आटपाडी६ लाख ६० हजार६ लाख ३० हजार
कवठेमहांकाळ२ कोटी ८३ लाख२ कोटी ७१ लाख
जत६ कोटी ९६ लाख५ कोटी ७२ लाख
एकूण३८ कोटी १ लाख३५ कोटी २१ लाख

Web Title: Farmers in Sangli district received Rs 35 crore for heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.