शेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 04:26 PM2019-10-30T16:26:51+5:302019-10-30T16:27:37+5:30

दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

Farmers' leaders ended BJP's existence | शेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवले

शेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवले

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवलेपुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस

अशोक पाटील 

इस्लामपूर : दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे पानिपत करण्यात आले. शेट्टी यांनी राष्ट्रवादी (साखर कारखानदार) यांच्याशी केलेला समझोता आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी परिधान केलेली भाजपची झूल वाळवा—शिराळ्यातील ऊस उत्पादकांना रुचली नाही. त्यामुळेच पुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस आले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूक चांगलीच गाजली. राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु राष्ट्रवादीचेच संभाजी कचरे यांनी बंडखोरी केली आणि जयंत पाटील आणि शिंदे गटातही दुही निर्माण झाली. त्यातच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांना विकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली.

येथूनच घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही फुटीची ठिणगी पडली. तेव्हापासून संघटनेतील धुसफूस वाढत गेली. एकमेकांवर आरोप—प्रत्यारोप झाले आणि या संघटनेतून खोत यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे रयत क्रांती संघटनेचा जन्म झाला. या संघटनेला प्रथमत: इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोठी साथ दिली होती.

वाळवा—शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या तिघांची एकवटलेली ताकद भाजपचे एकनिष्ठ विक्रम पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक यांना रुचली नाही. त्यातच नगराध्यक्ष पाटील आणि मंत्री खोत यांच्यातही काही कारणांनी मतभेद निर्माण झाले.

कालांतराने त्यांच्यातही फूट पडली. यानंतर महाडिक आणि विक्रम पाटील यांनी मंत्री खोत यांच्याशी संपर्क वाढवत नगराध्यक्ष पाटील यांना एकाकी पाडले. यामुळेच अंतिम टप्प्यापर्यंत भाजपच्या पदरात असलेली विधानसभेची उमेदवारी शिवसेनेकडे वर्ग झाली. याचे खापर मंत्री खोत यांच्यावरच फोडले जात आहे.

मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या नावाचा वापर करुन मोहिते बंधूंनी मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु वर्षभरातच हा फसवणुकीचा गोरखधंदा उजेडात आला. या घोटाळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच मुख्य असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी करुन खळबळ माजवली होती. परंतु विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी मात्र या कडकडनाथप्रश्नी ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळेच विरोधात असलेल्या अपक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी यांना चांगली मते मिळाली.

शिराळा मतदार संघातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उघडपणे भाजपला आणि आतील बाजूने महाडिक गटाला ताकद दिली. इस्लामपूर मतदार संघात शिवसेनेचा प्रचार करण्यात खोत आघाडीवर होते. परंतु कामेरी येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंत्री खोत यांचा आवाज का दबला गेला, हे अनुत्तरीत आहे.

Web Title: Farmers' leaders ended BJP's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.