शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया जूनपर्यंत रेंगाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:17 AM2020-01-17T11:17:46+5:302020-01-17T11:18:26+5:30
शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा बँकांच्या वसुलीवरही मोठा परिणाम होणार आहे.
सांगली : शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा बँकांच्या वसुलीवरही मोठा परिणाम होणार आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाखांवरील थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांनाही माफी देण्याचे संकेत दिले होते. तरीही शासनाच्या २७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाखांपर्यंत थकबाकीदार असलेल्या कर्जदारांनाच माफी मिळेल, असे म्हटले आहे.
त्यामुळे सध्या केवळ २ लाखापर्यंतचेच कर्जदार या योजनेस पात्र आहेत. अशा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून त्याचे लेखापरीक्षण १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे सध्या लेखापरीक्षणाची लगबग सुरू आहे.
लेखापरीक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शासनाचे योजनेसंदर्भात पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलवर संबंधित बँकांनी याद्या अपलोड करावयाच्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शासनामार्फत याद्यांची तपासणी होऊन पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करून त्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल.
त्यानंतरही पुन्हा शेतकऱ्यांच्या मान्य-अमान्यतेचा कल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. सध्याची एकूण गती पाहिल्यास, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात येण्यास जून महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.
प्रक्रियेचे हे टप्पे कितीही जलदगतीने पूर्ण केले तरी, त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. यापूर्वीच्या योजनेतही अशाप्रकारच्या अडचणींचा बांध तयार झाला होता. त्यामुळे अनेक महिने हा खेळ चालण्याची शक्यता आहे.
शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असला तरी, त्याला तातडीने मदत देण्याचा उद्देश पूर्ण होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शासन, सहकार विभाग, बँका यांच्यासमोर कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे हे एक आव्हान बनले आहे.