देशविघातक शक्तींकडून शेतकरी आंदोलन हायजॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:03+5:302020-12-16T04:41:03+5:30
सांगली : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदा केला, मात्र विरोधकांनी शेतकरी संघटनांना पुढे करीत आंदोलन सुरू ...
सांगली : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदा केला, मात्र विरोधकांनी शेतकरी संघटनांना पुढे करीत आंदोलन सुरू केले. आता देशविघातक शक्तींकडून हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
हाके म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचेच सर्व कायदे केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. तरीही विरोधकांनी शेतकरीविरोधात हे कायदे असल्याची अफवा पसरवून याविरोधात आंदोलन पेटविले. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना विचारुन शिफारसी घेतल्या आहेत. त्यांच्या टास्कफोर्सने शिफारशी दिल्या होत्या. त्यातच सुधारणा करून हा कायदा केंद्र सरकारने आणला. गेल्या सत्तर वर्षातील इंग्रजांनी आणलेले १ हजार ८०० कायदे कालबाह्य झाले होते. ते भाजपने बदलले.
उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकारने त्याचे पालन केले. शेतकऱ्यांना यापूर्वी बाजारात माल घेऊन आल्यानंतर दर ठरवण्याचा अधिकार नव्हता. तो आता या नव्या कायद्याने दिला आहे.
विरोधकांनी अपप्रचार करून कायद्याविरोधात आंदोलन उभे केले. यामागे देशविघातक संघटना आहेत. भाजपचा जनाधार वाढत असल्याने हे आंदोलन उभे केले आहे. पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. आंदोलन हे राजकीय आहे. देशभरातील २० राजकीय पक्षांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. परकीय शक्ती देशविरोधी कृती करणाऱ्या काही संघटना या आंदोलनात आहेत. नक्षली माओवाद्यांचे झेंडे आंदोलनात कसे?
चाैकट
पवारांचा तत्त्वत: विरोध नाही
शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा असताना, लोकसभेत मंजुरी मिळते आणि राज्यसभेत विरोध होतो. शरद पवारच यावेळी गैरहजर होते. शरद पवारांना या कायद्याला तत्त्वत: विरोध नाही, असेही हाके यांनी यावेळी सांगितले.