Sangli: शेतकरी संघटनेने कर्नाटकातील साखर वाहतूक रोखली, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन
By शीतल पाटील | Published: October 17, 2023 02:43 PM2023-10-17T14:43:26+5:302023-10-17T14:44:29+5:30
'वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार'
इस्लामपूर : गतवर्षी गाळप केलेल्या उसाला दिवाळीआधी १ हजार रुपये द्या. चालू गळीत हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये भाव द्यावा, अन्यथा दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी करत रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी - कामेरीदरम्यान बेळगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशक्ती कारखान्याची साखर वाहतूक तासभर रोखून धरली. उद्यापासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा देत वाहने सोडण्यात आली.
सोमवारी रात्री ९:०० च्या सुमारास बेळगावहून मुंबईकडे जाणारा साखरेचा भरलेला ट्रक येडेनिपाणी - कामेरी दरम्यान आशियाई महामार्गावर शिवशक्ती शुगर बिद्री कारखान्याची ३५ टन साखर भरलेला ट्रक अडवून ट्रक चालकास दोन तास थांबवून ठेवण्यात आले. कारखाना प्रशासनाने पुन्हा साखर पाठवणार नाही, असे सांगितल्यावरच ट्रक सोडला. जोपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा सर्व कारखानदार मागील वर्षीच्या गाळप केलेल्या उसाला दिवाळीआधी १ हजार रुपये, चालू गळीत हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये भाव द्यावा, हे जमत नसेल तर दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष प्रणव पाटील, विनोद चव्हाण, वैभव दाइंगडे, कृष्णात पाटील, दीपक पवार, अविनाश चव्हाण उपस्थित होते.
वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार : हणमंत पाटील
मंगळवारपासून सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी दोन दिवसांच्या आत निर्णय घेतला नाही तर गनिमी काव्याने मुंबईला जाणारी साखर, दूध, भाजीपाला बंद करणार. वेळप्रसंगी साखरेचे ट्रक ही जाळणार. कोणताही शेतीमाल मुंबई पुण्यास जाऊ देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही दुधाचा टँकर कोणत्याही मार्गे जाऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.