शेतकरी संघटनेने ऊसतोड रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:02 AM2017-10-30T00:02:22+5:302017-10-30T00:04:07+5:30
मिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये व अंतिम दर साडेचार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने वड्डी (ता. मिरज) येथे ऊसतोड रोखली.
मिरज तालुक्यातील वड्डी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोबरे यांच्या शेतात सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. कर्नाटकातील शिवशक्ती कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना पिटाळून लावण्यात आले. ऊसतोड मुकादमाकडून, ऊसतोड करणार नाही, अशी हमी घेण्यात आली. उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी व अंतिम दर ४५०० मिळावा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकºयाच्या उसाला आधारभूत किंमत मिळेपर्यंत उसाचे एक कांडेही कारखान्यांना नेऊ देणार नसल्याचे महादेव कोरे यांनी सांगितले. उसाला दर मिळावा, राज्यबंदी व अंतराची अट रद्द करावी यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कोरे यांनी दिला. कमलेश्वर कांबळे, किरण पाटील, गुंडू जतकर, नानासाहेब काणे, प्रदीप कार्वेकर, सुरेश आंबी, शशिकांत गायकवाड, अरुण क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
रविवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलन करीत ऊस तोड बंद पाडल्याने, पोलीस याबाबत अनभिज्ञ होते. मिरज परिसरातील अनेक गावांत कर्नाटकातील कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या आल्या असून, शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ऊसतोड थांबणार आहे. ऊस दर जाहीर होईपर्यंत ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला असल्याने रात्रीच्यावेळी प्रमुख मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जबरदस्तीने ऊसतोड व वाहतूक रोखणाºयांवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला असल्याने ऊस दरासाठी संघर्षाची चिन्हे आहेत.