पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:41+5:302021-07-08T04:18:41+5:30
सांगली : खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी दि. ३१ जुलै व इतर ...
सांगली : खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी दि. ३१ जुलै व इतर खरीप पिकांसाठी दि. ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीक स्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता करून नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहेत. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण १९ पिके खरीप हंगाम स्पर्धेतील आहेत. पीक स्पर्धा विजेत्यांसाठी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार, दि्वतीय तीन हजार आणि तृतीय दोन हजार, तर जिल्हा पातळीवर प्रथम दहा हजार, दि्वतीय सात हजार आणि तृतीय पाच हजार बक्षीस देण्यात येणार आहे. विभाग पातळीवर प्रथम २५ हजार, दि्वतीय २० हजार आणि तृतीय १५ हजार, तर राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार, दि्वतीय ४० हजार, तर तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.