शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:45+5:302021-01-24T04:11:45+5:30
कोकरुड : शेती, शेतीपूरक व्यवसाय याची सांगड घालण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर ...
कोकरुड : शेती, शेतीपूरक व्यवसाय याची सांगड घालण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवावे, असे मत कृषी उपसंचालक प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केले.
कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे कृषी विभागामार्फत आयोजित रोजगार हमी कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, आपल्या घरामध्ये व शेतामध्ये उत्पन्न होणारा कचरा पालापाचोळा कुजवून उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत तयार होते. याचा फायदा होऊन रासायनिक खताचा वापर कमी होईल. रोजगार हमी योजनेंतर्गत घर तिथे शोष खड्डा व नॅडेप हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत. यासाठी सर्वांनी सहभाग घेतल्यास याचा फायदा सर्व कुटुंबाना होणार आहे.
यावेळी कुसाईवाडी येथे कृषी विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत नाडेप (खत खड्डा) ची ५० प्रकरणे मंजूर झालेल्या कामाचा प्रारंभ व शेतकऱ्यांना कीटकनाशके, तण नाशके व टॉनिकचे वाटप करण्यात आले.
सरपंच विनोद पन्हाळकर, मिरज उपविभागीय कृषी अधिकारी हणमंत इंगवले, तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील, मंडळ कृषी अधिकारी ए. एन. शिंदे, कृषी पर्यवेक्षक अजित भोसले, कृषी सहायक श्रीकृष्ण पाटील, सातलिंग मिटकरी, ऋषिकेश भुईकर, राहुल शिंदे, सुभाष पवार उपस्थित होते.
कोट
एकाच वेळी नाडेप योजनेंतर्गत ५० लाभार्थी असलेले कुसाईवाडी हे गाव राज्यात एकमेव असून, दोनशे कुटुंबांपैकी पहिल्या टप्प्यात ५० जणांनी यात भाग घेतला. गावातील सर्व कुटुंबांपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे.
- विनोद पन्हाळकर, सरपंच
फोटो-२३ कोकरुड ३
फोटो ओळ : कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे कृषी विभागामार्फत आयोजित रोजगार हमी कार्यक्रमात कृषी उपसंचालक प्रभाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले.