शेतकऱ्यांचा ठिय्या सुरूच
By Admin | Published: July 7, 2015 11:28 PM2015-07-07T23:28:17+5:302015-07-07T23:28:17+5:30
दुसरा दिवस : ४२ गावांना विविध संघटनांचा पाठिंबा
सांगली : जत पूर्व भागातील ४२ गावांतील शेतकऱ्यांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून त्यांच्या शेतीला पाणी द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्यादिवशी ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. दरम्यान, विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावे गेल्या ३२ वर्षांपासून दुष्काळात होरपळत आहेत. या गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे, अन्यथा सरकारने कर्नाटकात जाण्याचे ‘ना हरकत’ पत्र द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्यासाठी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख, निवृत्ती शिंदे, संजय तेली, राजू चव्हाण, मल्लिकार्जुन सुरगोंड, मानसिध्द शिरगट्टी, संगू गवळी, रोहिदास सातपुते, चिदानंद आवटी, संतोष गुरव, हरिष शेटे, भीमू नागोंड, काशिलिंग बिराजदार, चंद्रकांत नागणे, महंमद कलाल यांच्या नेतृत्वाखाली उमदी ते सांगली पदयात्रेने सांगलीत येऊन येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनस्थळी माजी महापौर सुरेश पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, वकील संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पाटील, मल्लिकार्जुन कलशेट्टी, मराठा सेवा संघाचे महादेव साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, संभाजी सरगर आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची भेट
लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी सचिन पवार व सुभाष घोलप यांनी मंगळवारी दुपारी आंदोलनस्थळी भेट दिली. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक बोलावली असून, यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे. तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी यास ठाम नकार दिला. या बैठकीकडे लक्ष लागले आहे.