शेतकरी संपावर, शहरे सलाईनवर

By admin | Published: June 1, 2017 11:38 PM2017-06-01T23:38:23+5:302017-06-01T23:38:23+5:30

शेतकरी संपावर, शहरे सलाईनवर

On Farmers Stations, Cities on Saline | शेतकरी संपावर, शहरे सलाईनवर

शेतकरी संपावर, शहरे सलाईनवर

Next


सांगली : शेतकरी संपाचे परिणाम आता सांगली जिल्ह्यात दिसू लागले आहेत. शेतीमाल, दूध पुरवठा ठप्प झाल्याने शहरांमधील बाजारपेठांवर शुक्रवारपासून मोठा परिणाम दिसणार आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे शहरे सलाईनवर राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक तालुक्यात आंदोलक रस्त्यावर उतरत असून दूध पुरवठ्यावर सर्वाधिक हल्लाबोल होत आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक आक्रमक आंदोलन सुरू झाले आहे. ठिकठिकाणी शेतीमाल, दूध पुरवठा बंद ठेवून संपास सुरुवात झाली, तर काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतणे, वाहनांचे टायर फोडणे अशी आक्रमक आंदोलने सुरू झाली आहेत.
आज गाव बंदचा निर्णय
देवराष्ट्रे : शेतकरी संपाला सोनहिरा खोऱ्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपाला पहिल्याचदिवशी हिंंसक वळण मिळाले. देवराष्ट्रे येथे हुतात्मा दूध संघ व आणखी एका दूध संघाची गाडी अडवून दुधाने भरलेले कॅन रस्त्यावर ओतण्यात आले. शुक्रवारी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास हुतात्मा दूध संघाची गाडी अंबक येथून दूध घेऊन जात असताना शेतकऱ्यांनी ती देवराष्ट्रे ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीजवळ अडवली व यामधील दुधाने भरलेले कॅन रस्त्यावर ओतले. यावेळी गाडीचालकाला, ‘उद्यापासून संप मिटेपर्यंत दूध घेऊन जाऊ नकोस’, असे सांगण्यात आले. यानंतर शेतकरी मुख्य बाजारपेठेतून घोषणा देत शिवाजी चौकात आले. याचवेळी आणखी एक दुधाने भरलेली गाडी तेथे दाखल झाली. ही गाडीही अडवून मुख्य चौकातच दुधाचे कॅन रिकामे केले गेले. यावेळी माजी उपसभापती मोहनराव मोरे, पोपटराव महिंंद, आनंदराव मोरे, विक्रम शिरतोडे, जयकर पवार, सतीश शिरतोडे, श्रीदास होनमाने, आत्माराम ठोंबरे, सचिन शिंंदे, अमोल मोरे, अभिजित मोरे, पृथ्वीराज होनमाने, सौरभ कांबळे, प्रशांत मोरे, चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते. मोहिते वडगाव (ता. कडेगाव) येथील सर्व शेतकरी व दूध संकलन केंद्रांनी गावातील दूध संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला.
खानापूर तालुक्यात दूध संकलन ठप्प
विटा : शेतकरी संपाला खानापूर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. विटा शहरासह तालुक्यातील दूध संकलन ठप्प झाले होते, तर विट्याच्या आठवडा बाजारात गुरुवारी तुरळक गर्दी होती. दरम्यान, विटा येथे लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघ व हणमंतवडिये येथील क्रांतिसिंह नाना पाटील दूध संघाने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला असून, या दोन्ही संघांनी दूध संकलन व वितरण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. विटा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्राकडे पाठ फिरविली होती. शुक्रवारपासून दूध खरेदी व विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघाचे कार्यकारी संचालक विशाल पाटील यांनी सांगितले की, विराज दुधाचे मुंबई, पुणे व कोकण भागात वितरण होत आहे. परंतु, शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील दूध संघाचे संस्थापक अ‍ॅड. सुभाष पाटील व अध्यक्ष जयराम मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात तातडीची बैठक घेऊन, संपाला पाठिंबा देण्याबरोबरच दूध संकलन व विक्री बंद करण्याची घोषणा केली.
रसूलवाडीत वाहनाचे टायर फोडले
मिरज : रसूलवाडी ते कांचनपूर रस्त्यावर आंदोलकांनी दूध वाहतूक करणारे वाहन अडवून दोनशे लिटर दूध रस्त्यावर ओतले. तसेच एका जीपचे टायर फोडण्यात आले. त्यामुळे कांचनपूरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. रसूलवाडी ते कांचनपूर रस्त्यावर गुरुवारी सकाळी शेतकरी संघटनेचे बिल्ले लावलेल्या आंदोलकांनी दूध घेऊन जाणारे वाहन अडवून त्यातील कॅन रस्त्यावर ओतले. बिसूर, कवलापूर, रसूलवाडी, कांचनपूर येथून सुमारे चारशे लिटर दूध संकलन करून वारणा दूध संघाचे तीन कर्मचारी दूध घेऊन जात असताना त्यातील दोनशे लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले. यावेळी दुधाच्या वाहनामागे असलेल्या एका जीपचे टायर फोडून आंदोलकांनी पलायन केले. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण व सांगली ग्रामीण पोलिस घटनास्थळी आले व बंदोबस्त तैनात करण्यात आला.
‘चितळे’चे
दूध संकलन
आज बंद
भिलवडी : शेतकऱ्यांची सोय म्हणून चितळे डेअरीची दूध संकलन केंद्रे शुक्रवारी (२ जून) सकाळी बंद राहतील. परंतु जे शेतकरी चितळे डेअरीत दूध आणून घालतील, त्यांचे दूध स्वीकारण्यात येणार आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली आणि कोकण या ठिकाणचा दूध पुरवठा नियमित ठेवण्याची व्यवस्था डेअरीमार्फत केली असल्याची माहिती चितळे डेअरीचे भागीदार गिरीश चितळे यांनी दिली. दूध पुरवठ्यासाठी स्थानिक पोलिस व्यवस्थापनाचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे.

कवठेमहांकाळमध्ये टँकर रोखले
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात गुरुवारी शेतकरी संपात मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर शेळ्या, मेंढ्या वाहतूक करणाऱ्या तीन टेम्पोची टायर फोडली, तसेच दूध वाहतूक करणारे चार टँकर रोखले. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा, संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतकरी संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुपारी बारानंतर शेळ्या, मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या तीन टेम्पोचे टायर फोडले. तसेच दूध वाहतूक करणारे चार टँकर रोखले. रांजणी, कवठेमहांकाळ मार्गावर तसेच मिरज-पंढरपूर रस्त्यावर टँकर रोखण्यात आले.

Web Title: On Farmers Stations, Cities on Saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.