शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

By admin | Published: September 2, 2016 11:28 PM2016-09-02T23:28:43+5:302016-09-03T01:04:36+5:30

अमर हबीब : शेतकरी संघटनेचा सांगलीत मेळावा

Farmers, stop watching yourself! | शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

Next

सांगली : आज शेतकऱ्यांची मुले शिकून गाव सोडून शहरात राहण्यास जात असून, त्यांनी स्वत:चे विश्व तयार केले आहे. याच्या बाहेर पाहण्यास ते तयार नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी आपल्यापुरताच विचार न करता शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे मार्गदर्शक अमर हबीब यांनी शुक्रवारी येथे केले. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रकाशराव जाधव होते.
हबीब म्हणाले की, सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या धोरणाविरोधात लढा देण्याचे बळ शरद जोशी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना दिले. महात्मा फुले यांनी, बहुजनांची मुले शिकली तर ती नक्कीच समाजाचे ऋण फेडतील, असा विचार मांडला होता. मात्र, असे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मुले शिकून मोठी झाली, पण ती शेतकऱ्यांना विसरली आहेत. शहरात राहणारा हा वर्ग संघटनेच्या पाठीशी राहिला, तरच शेतकऱ्यांचे दुखणे कमी होणार आहे.
सिलिंग, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. मूलभूत अधिकारातून मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशात वाढलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकपाल कायद्याची आवश्यकता नाही, तर शासनाने निर्माण केलेल्या अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केला, तर ९० टक्के भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार असल्याचेही अमर हबीब यांनी सांगितले.
यावेळी संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, छायाचित्रकार यांना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, शेतकरी सेनेचे बाळासाहेब कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, जयपाल फराटे, अच्युत गंगणे, पुंडलिकराव जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ अशक्य
शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ करण्याविषयी अनेकजण मत व्यक्त करत असले तरी, ते आता शक्य नाही. कारण मतदार संघाच्या पुनर्रचनेमुळे नागरी मतदारांत वाढ झाली आहे. त्यामुळे शिवरायांच्या गनिमी काव्यानुसार आता संघटनेला शहरात घुसावे लागणार आहे व नागरी मतदारांसमोर समस्या व हेतू मांडावा लागणार असल्याचेही हबीब यांनी सांगितले.

सरकार हे शत्रूच!
सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू असते. अशी शिकवण शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यामुळेच कार्यकर्ते शासकीय धोरणाच्या विरोधात पोटतिडकीने लढा उभारून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, असे हबीब म्हणाले.

Web Title: Farmers, stop watching yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.