शेतकरी संपाचा वणवा जिल्ह्यात भडकणार!
By admin | Published: April 28, 2017 11:57 PM2017-04-28T23:57:23+5:302017-04-28T23:57:23+5:30
गनिमी काव्याने तयारी सुरू : संपूर्ण कर्जमाफीसाठी एल्गार; ‘स्वाभिमानी’ ‘बळीराजा’चाही पाठिंबा, १ जूनची डेडलाईन
प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
नगर जिल्ह्यातील काही गावांत सुरू झालेला शेतकरी संपाचा वणवा सातारा जिल्ह्यातही भडकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एका बाजूला विरोधी पक्षाच्या आमदारांची संघर्ष यात्रा नुकतीच झालीअसताना दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे एक पथक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहे. विविध शेतकरी व अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांची सकारात्मक चर्चा झाली असून, शेतकऱ्यांचा संप यशस्वी करण्यासाठी व्यक्तिगत मतभेद आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून गनिमी काव्याने लढण्याची तयारी सुरू झाली आहे.
व्यावसायिक आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संपाचे हत्यार उपसत असतील, नोकरदार आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपावर जात असतील तर शेतकऱ्याने संपावर का जाऊ नये?, असा प्रश्न त्यांना पडला असून, संपूर्ण कर्जमाफी, निवृत्तीवेतनासह इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत गावागावात शेतकऱ्यांशी चर्चा करून ग्रामसभेमध्ये अनेक ठिकाणी ठरावही करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातही हे लोण आता पसरू लागले आहे.
सलग दोन वर्षांची दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर पाऊस होऊनही शेतमालाच्या कवडीमोल किमतीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी संकटात असूनही राज्य व केंद्र सरकार शेती आणि शेतकऱ्याकडे उदासीन वृत्तीने बघत असल्याच्या भावना निर्माण झाल्या आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ‘भीक नको पण घामाचा दाम मिळावा’ असे वाटत आहे.
‘स्वाभिमानी’ आणि ‘बळीराजा’चाही पाठिंबा
‘किसान क्रांती’ चळवळीने १ जूनपासून शेतकरी संपावर जाण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. त्याला कऱ्हाड तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे व बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे पाठिंबा दिला आहे. गळीत झालेल्या उसाला गुजरातमध्ये प्रतिटन ४ हजार ४४४ रुपये भाव मिळतो. तर महाराष्ट्रात हा दर २ हजार २०० ते २ हजार ८०० पर्यंतच पोहोचतो. ही बाब चुकीची असून, गळीत झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन हजार रुपयेप्रमाणे मिळावा, अशी मागणीही या पत्रकात करण्यात आली आहे.
सर्वसमावेशक नेतृत्व असणारी चळवळ
मराठा क्रांती मोर्चाने ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांना बगल देत राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भव्यदिव्य असे मोर्चे यशस्वी करून दाखविले. त्याच पावलावर पाऊल टाकत ‘किसान क्रांती’ चळवळ वाटचाल करत आहे. यामध्ये सर्व पक्षीय राजकीय नेतृत्वांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून ही शेतकऱ्यांची चळवळ बनवण्याचे काम सुरू आहे.
संपाचे हत्यार उपसले..
उद्योजकांनी संप केला की त्यांचे कर्ज माफ होते. व्यापाऱ्यांनी संप केला की त्यांचा फायदा होतो, सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केला की वेतन आयोग वाढवून मिळतो. मात्र, कधीही संपावर न गेलेल्या शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्यानेच शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्यासाठी संपाचे हत्यार उपसल्याचे संयोजक सांगतात.
शेतकरी संपाचे हत्यार तळपते ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातही १ मे रोजी जास्तीत जास्त ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १ जूनपासून संपावर जात असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घ्यावा, अशा बाबतच्या सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत.
‘शेतकरी संपावर
गेला तर...’
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ‘मी मुख्यमंत्री झालो तर...’, ‘आई संपावर गेली तर...’ असे विषय निबंधासाठी दिले जातात. त्यामध्ये ‘शेतकरी संपावर गेला तर...’ असा विषय बहुधा कधी दिलाच गेला नाही. यावरून शेतकरी संपावर जाणारच नाही, अशी धारणा साऱ्यांनी करून ठेवली आहे. पण आता १ जूनपासून शेतकऱ्यांनीच संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आता सरकारवरच ‘शेतकरी संपावर गेला तर...’ हा निबंध लिहिण्याची वेळ आली आहे.
संपात सहभागी होणार म्हणजे काय करणार?
१. शेतामध्ये यावर्षी बियाण्यांची पेरणी करायची नाही.
२. दुग्धपालन व्यवसायातून मिळणारे दूध बाजारात विकायचे नाही.
३. शेतात पिकत असलेला भाजीपाला व अन्नधान्य कोणाला विकायचे नाही.
४. शेतमजुरांनी कोणाच्या शेतात कामाला जायचे नाही.
५. आपली अवजारे घेऊन इतरांच्या शेतातही मशागतीला जायचे नाही.
१. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
२. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा.
३. शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
४. शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा.
५. शेतकऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजना सुरू करावी.
६. रोजगार हमी योजना शेतीवर लागू करावी.
७. दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर मिळावा.