कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: April 9, 2017 11:33 PM2017-04-09T23:33:56+5:302017-04-09T23:33:56+5:30
मसूरमधील घटना; बाथरूममध्ये गळफास; बँका, सोसायटीसह फायनान्सचेही कर्ज
मसूर : येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दामोदर नथाराम बर्गे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, मसूर येथे दामोदर बर्गे हे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडांसह वास्तव्यास असून, या कुटुंबाला दोन एकर शेतजमीन आहे. दामोदर यांचा थोरला मुलगा मोलमजुरी करतो, तर लहान मुलाने वडाप व्यवसायासाठी फायनान्सवर कर्ज काढून रिक्षा खरेदी केली आहे. दामोदर यांची पत्नी शेतीकाम करत घर सांभाळते. दामोदर यांनी शेती व मुलांच्या रोजगारासाठी बँक, सोसायटी, फायनान्स कंपनी व इतर ठिकाणाहून पैसे घेतले होते. या कुटुंबावर विविध ठिकाणचे कर्ज असल्याने त्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. शेतीतून उत्पन्न न निघाल्याने व कर्ज वसुलीचा तगादा असल्यामुळे दामोदर यांनी यापूर्वीच अर्धा एकर शेती विकली आहे. त्यानंतरही कर्जाच्या परतफेडीसाठी विविध ठिकाणांहून तगादा सुरू होता. सर्व कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याने घरात वादविवाद व मानसिक ताणतणाव होत होता. या कर्जबाजारीपणास कंटाळून दामोदर यांना मानसिक नैराश्य आले होते. या नैराश्यापोटी त्यांनी रविवारी पहाटे राहत्या घरी बाथरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
सकाळी बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने दामोदर यांची नात तिकडे गेली असता आजोबांचा मृतदेह लटकत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी याबाबत मसूर पोलिस दूरक्षेत्रात माहिती दिली. याबाबत मसूर पोलिस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे.
आत्महत्यांचं सत्र सुरूच
कऱ्हाड शहरासह तालुक्यात गेल्या महिन्यापासून आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. एका दाम्पत्याने तीन मुलांना नदीपात्रात फेकून देऊन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वडगाव हवेलीतील दोन सख्ख्या भावांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी कऱ्हाडातील उद्योजकाने आत्महत्या केली तर त्याच दिवशी मलकापूर येथील तणावग्रस्त युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. या घटना ताज्या असतानाच रविवारी पहाटे मसूर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.