आठ लाख कर्जाच्या दडपणामुळे लिंगनूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:21 PM2017-10-19T14:21:39+5:302017-10-19T14:28:26+5:30
लिंगनूर (ता. मिरज) येथील तुकाराम गोपू चौगुले (वय ५०) या शेतकऱ्याने मंगळवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तुकाराम चौगुले यांची दीड एकर बाग आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने बागेसाठी घेतलेले ८ लाखांचे कर्ज कसे फेडायचे? या दडपणामुळे आलेल्या निराशेतून चौगुले यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.
लिंगनूर , दि. १९ : लिंगनूर (ता. मिरज) येथील तुकाराम गोपू चौगुले (वय ५०) या शेतकऱ्याने मंगळवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तुकाराम चौगुले यांची दीड एकर बाग आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने बागेसाठी घेतलेले ८ लाखांचे कर्ज कसे फेडायचे ? या दडपणामुळे आलेल्या निराशेतून चौगुले यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.
चौगुले हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. २०१५ मध्ये त्यांनी शेती सुधारणा व द्राक्ष बागेसाठी बँक आॅफ इंडियाकडून ७ लाखांचे कर्ज घेतले होते. पहिल्यावर्षी जेमतेम उत्पन मिळाले.
यंदा दुसऱ्यावर्षी चांगले उत्पन मिळेल आणि कर्जाचे हप्ते भरता येतील, या हेतूने त्यांनी यावर्षी द्राक्षबागेत औषधे व खते यासाठी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च केले होते, मात्र पावसाच्या लहरीपणामुळे चौगुले यांची जोमात आलेली बाग फळकुज, द्राक्ष मणीगळ होऊन ९० ते ९५ टक्के वाया गेली. यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून ते सतत तणावात होते.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी पुतण्या सचिन चौगुले याच्याकडे पावसाने बाग वाया गेल्याने कर्जाचे हप्ते, व्याज तसेच यावर्षी केलेला बागेचा खर्च असे एकूण ९ लाख रुपये कसे उभारायचे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, ही गोष्ट सतावत असल्याचे बोलून दाखवले होते.
मंगळवारी रात्री मुलगा व पत्नी गावात दवाखान्यात गेल्यानंतर तुकाराम यांनी गोठ्यात जाऊन बागेसाठी आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळांनतर हा प्रकार त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आला. त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तुकाराम चौगुले यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.