कवठेएकंदच्या शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Published: June 19, 2015 12:17 AM2015-06-19T00:17:32+5:302015-06-19T00:19:13+5:30
सांगलीतील घटना : कृष्णा नदीच्या पुलाला गळफास घेतला
सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील प्रमोद आप्पासाहेब खाडे (वय ४२) या शेतकऱ्याने सांगलीतील बायपास रस्त्यावरील कृष्णा नदीच्या पुलाखालील कठड्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली.
प्रमोद खाडे दुपारी घरातून बाहेर पडले होते. त्यांचा भाऊ जिल्हा परिषदेत अभियंता आहे. दुपारी सव्वाचार वाजता खाडे यांनी भावाला मोबाईलवर संपर्क साधून ‘तू आईला सांभाळ, मी आत्महत्या करीत आहे’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा मेहुण्याशी (पत्नीच्या भावास) मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी आत्महत्या करीत आहे, तुझ्या बहिणीला सांभाळ’, असे सांगून मोबाईल बंद केला. खाडे यांच्या भावाने व मेहुण्याने त्यांना पुन्हा मोबाईलवर संपर्क साधला. परंतु, त्यांचा मोबाईल बंद होता.
खाडे बायपास रस्त्यावरील कृष्णा नदी पुलावरील सिमेंटच्या संरक्षण कठड्याला बसवण्यात आलेल्या लोखंडी पाईपवर गेले. तेथे त्यांनी दोरीने गळफास घेऊन नदीच्या दिशेने खाली उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
पुलाखाली एकाचा मृतदेह गळफासाने लटकत (पान १० वर)
नैराश्येतून कृत्य?
खाडे यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. तीन ट्रॅक्टर आहेत. ते स्वत: शेती करीत होते. गेल्या आठ दिवसांपासून ते नाराज होते. यातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. या प्रकरणी नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.