नियमित कर्जफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:17+5:302021-07-16T04:19:17+5:30
उमदी : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना ...
उमदी : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. थकीत कर्जदारांना लाभ मिळाला, पण नियमित कर्जफेड करणारे शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. दोन लाखांवरील कर्जदारांचे पैसे भरून घेऊन दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. दोन लाखापर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु नियमित कर्जदारांचे प्रोत्साहन अनुदान दोन वर्षे झाले तरी अजून मिळाले नाही. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. कर्ज परतफेड करून चुकलो की काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी ३० जूनपर्यंत पीककर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याचे अट होती. अनुदान मिळेल या आशेवरती शेतकरी स्वतः जवळ पैसे नसतानाही उसने पैसे घेऊन, सोने गहाण ठेवून आपले कर्जफेड केले होते. दोन वर्षे संपले तरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.