शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
By admin | Published: March 5, 2016 12:22 AM2016-03-05T00:22:25+5:302016-03-05T00:22:41+5:30
चंद्रकांत पाटील : संख येथील बैठकीत चारा, पाणी टंचाईचा आढावा
संख : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
संख (ता. जत) येथे ते आढावा बैठकीत बोलत होते. आढावा बैठकीमध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई, म्हैसाळ योजनेचा आढावा घेतला. पाणी टंचाईचा आढावा तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गव्हाणे, उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी, तर म्हैसाळ योजनेचा आढावा कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पन्न समितीच्या आवारात गोदाम, कोल्ड स्टोअरेज बांधणार आहोत. तसेच मागेल त्याला टॅँकर दिले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्व भागातील ओढापात्रात सोडण्यासाठी २०० कोटी रुपयांची गरज आहे. ते पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी जनावरांना चारा छावणीची मागणी केली. तसेच जनावरांना छावणी सुरू करण्यासाठी चारा डेपो किंवा छावण्या सुरू केल्या जातील. खा. संजय पाटील यांनी, २०० कोटी रुपये म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी देऊन ८० गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. आ. विलासराव जगताप म्हणाले की, म्हैसाळ योजनेसाठी २०० कोटी निधी द्यावा, तालुका विभाजन करावे, तालुक्यासाठी पूर्व भागात एक अतिरिक्त तहसीलदार देण्याची मागणी केली आहे. यावेळी आ. सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी अशोक पाटील, माजी सभापती आर. के. पाटील, राजेंद्र कन्नुरे, डॉ. रवींद्र आरळी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या सूचना स्वीकारणार
सध्या जो शेतकऱ्यांच्या सुविधांवर बोलतो तो नेता आणि जो शेतकऱ्यांच्या सवयीवर बोलतो तो शत्रू, असे मानण्याची पध्दत वाढली आहे. तुम्ही सूचना करा, त्या स्वीकारल्या जातील असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.