कुंडलवाडीत पावणेर पद्धतीने शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:58+5:302021-07-10T04:18:58+5:30
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे शेतातील कामे करण्यासाठी परंपरागत अशा पावणेर (कामाच्या बदल्यात जेवण) पद्धतीचा अवलंब केला ...
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे शेतातील कामे करण्यासाठी परंपरागत अशा पावणेर (कामाच्या बदल्यात जेवण) पद्धतीचा अवलंब केला जात आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीनुसार एकमेकांच्या मदतीने परस्पराच्या शेतातील कामे केली जात आहेत. शेतातील टोकणी व उसाच्या लागणीची कामे या पावणेरमुळे कौतुकाचा विषय ठरली आहेत.
या परिसरातील बहुतांश युवक कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कामास जातात. मात्र कोरोनामुळे औद्योगिक वसाहतीमधील निम्म्याहून जास्त कारखाने बंद असल्याने हे युवक घरीच आहेत. आता खरीप पेरणीचा हंगाम सुरू असल्याने आपला वेळ शेतीसाठी देण्याची मानसिकता या युवकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच लुप्त होत चाललेली पावणेरची पद्धत पुन्हा दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील कामे पूर्ण केली आहेत. ही कामे करताना अनेकदा शेतमजुरांची वानवा भासत होती. ही अडचण ओळखून तरुणांनी एकत्र येत एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशाने शेतातील कामे पूर्ण केली आहेत.