विलासराव जगतापांचे पोलिसांविरोधात उपोषण
By Admin | Published: March 6, 2017 11:56 PM2017-03-06T23:56:57+5:302017-03-06T23:56:57+5:30
जत, उमदी ठाण्यांवर हप्तेखोरीचा आरोप : गुंडगिरी पोसण्याविरुद्ध विधानसभेत आवाज उठवणार
जत : जत आणि उमदी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना विविध बेकायदेशीर व्यवसायातून अनधिकृत उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे येथील अधिकारी सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याऐवजी गुंडगिरीला पोसण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी केला. या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील जत व उमदी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाजप व मित्रपक्षांच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यावेळी आ. जगताप बोलत होते.
ते म्हणाले की, जत व उमदी येथील पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आम्ही पुराव्यासह वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. जत पोलिस ठाण्यास अठरा लाख, तर उमदी पोलिसांना दरमहा चौदा लाख रुपये मिळतात. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. जर या चौकशीत तथ्य आढळून आले नाही, तर मी चुकीचे आरोप केले आहेत, म्हणून माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. सध्या आम्ही आमच्या तलवारी म्यान केल्या आहेत. जर आमच्या मागणीची दखल घेऊन वरिष्ठांनी योग्य कारवाई केली नाही, तर त्या बाहेर काढाव्या लागणार आहेत. जत तालुक्यातील प्रस्थापितांची एकेकाळी होत असलेली गुंडगिरी मोडून काढून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: देखील गुंडगिरी केली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचार कालावधित जत आणि उमदी पोलिसांनी सर्वाधिक त्रास भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. आमच्या कार्यकर्त्यांविरोधात कडक कारवाई केली, तर विरोधकांवर जुजबी कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी उमदी येथील बाजार समिती जमीन खरेदी प्रकरणात ७५ लाख रुपये मिळविले आहेत. जत तालुक्यात वाळू उपसा करण्यास पर्यावरण विभागाची बंदी असताना, महसूल विभागाच्या मूक संमतीने वाळू उपसा होत आहे. त्यामुळे येथे पाणी टंचाई जाणवत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी स्वागत केले. यानंतर भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवींद्र आरळी, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, अॅड. प्रभाकर जाधव, उमेश सावंत, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, शिवाजीराव ताड, डी. एस. कोटी, राजू मांगलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता पवार, मंगल जमदाडे, स्नेहलता जाधव, शिवाप्पा तावशी, आप्पासाहेब नामद, रामाण्णा जीवन्नवार, श्रावण पाथरुट, माणिक वाघमोडे यावेळी उपस्थित होते. सरदार पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)