उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली, मिरज-आरग मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
By श्रीनिवास नागे | Published: June 22, 2023 06:25 PM2023-06-22T18:25:16+5:302023-06-22T18:33:11+5:30
प्रांतांचे चौकशीचे आदेश, बांधकाम विभागाकडून नोटिसा !
मिरज : बेडग (ता. मिरज) येथील मिरज-आरग जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, या मागणीसाठी मिरजेत सुरू असलेल्या आंदोलनातील एका उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाद न मिटल्याने दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते.
बेडग येथून जाणाऱ्या मिरज-आरग या जिल्हा मार्गालगत अनेक अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघात वाढल्याने ही अतिक्रमणे काढण्यात यावीत, या मागणीसाठी बेडग येथील शिवाजी कांबळे, रणजित कांबळे, प्रदीप भोसले, राहुल कांबळे, वासुदेव कांबळे, छाया कांबळे, अर्चना कांबळे, रेखा खाडे, अर्चना कांबळे यांनी मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांपैकी अर्चना सुनील कांबळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. अतिक्रमण हटविण्याच्या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम आहेत. महेश कांबळे, सचिन कांबळे, तुषार खांडेकर यांच्यासह उपोषणाला पाठिंब्यासाठी आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रांतांचे चौकशीचे आदेश, बांधकाम विभागाकडून नोटिसा !
उपोषणाची दखल घेऊन बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यापासून १० मीटर अंतरावरील अतिक्रमण असलेल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. २४ तासांत अतिक्रमणे हटविण्याची मुदत दिली आहे. रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटर अंतरावरील बांधकामाबाबत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी तहसीलदार व नगररचना विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.