आष्टयानजीक एस.टी बस, ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह १४ जण जखमी, ट्रक चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:38 PM2022-10-03T18:38:18+5:302022-10-03T18:53:01+5:30
धडक देऊन ट्रक सुमारे २०० मीटर वर जाऊन थांबला
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टयानजीक एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एस.टी बसमधील विद्यार्थ्यासह १४ जण जखमी झाले. जखमींना आष्टा ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. हा अपघात आज, सोमवार दुपारच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर-सांगली एसटी बस (एम.एच.२०-बी.एल.-०२३५) आष्टा नजीक शिंदे मळ्याजवळ आली असता समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्रमांक (एम.एच.२६ बी.डी.४९४९)ची एसटीला भीषण धडक झाली. या धडकेत एसटीच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. धडक देऊन ट्रक सुमारे २०० मीटर वर जाऊन थांबला असता चालकाने तेथून पलायन केले. या धडकेत एसटीमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात साक्षी तानाजी गायकवाड (वय १८), सुभान शहा (१८), स्वप्निल संजय अवताडे (१८), यशराज विजय कुंभार (१९), संकेत दिलीप वडगावकर (१९), जयश्री दत्तात्रय शिंदे (५५, सर्व रा. आष्टा), चालक हरून हसीन मुलानी (५३ रा पेठनाका), नदीम इकबाल आगा (४२, रा. इस्लामपूर), पार्वती आत्माराम पवार (६०, रा. कराड), शारदा बळवंत गुरव (६०) बळवंत शंकर गुरव (६५, दोघे रा. सांगलीवाडी), शुभांगी अमर गुरव (३२ रा. शिगाव), अनुसया संपत गुरव (५० रा. शिगाव) व राजश्री दिलीप शिंदे (४८ रा. आष्टा) अशी जखमींची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, संजय सनदी, इस्लामपूरच्या सहायक वाहतूक अधिकारी वासंती जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, भाजपचे प्रवीण माने यांच्यासह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात गर्दी केली होती.