जत तालुक्यात थंडी द्राक्षासाठी मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:06+5:302020-12-29T04:26:06+5:30
संख : जत तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पारा १५ अंशांवर आला आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी घसरणार आहे. तो ...
संख : जत तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पारा १५ अंशांवर आला आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी घसरणार आहे. तो बारा अंशांवर येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकासाठी थंडी पोषक, तर द्राक्षांसाठी मात्र मारक ठरते आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्याची वाढ थांबली आहे. मणी तडकू लागले आहेत. बागेत उबदारपणा येण्यासाठी शेतकरी पाटपाणी, ठिंबकने जादा पाणी देत आहेत. शिवाय काही ठिकाणी मण्याच्या वाढीसाठी फवारणी केली जात आहे.
तालुक्यात ११ हजार एकर क्षेत्रावर द्राक्षे बागा आहेत. पूर्व भागात दर्जेदार बेदाण्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ऑक्टोबर महिन्यात छाटणी घेऊन नैसर्गिकरित्या उत्पादन घेतले जाते. तालुक्यात गेल्या आठवड्यापासून थंडीची लाट आहे. पारा घसरतो आहे. किमान तापमान १५ अंशांवर आले आहे. येत्या काही दिवसात १४ ते १२ अंशांवर तापमान घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कमी तापमान तालुक्यातील रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा, ज्वारी पिकांना पोषक आहे. द्राक्ष बागावर मात्र त्यांचा विपरित परिणाम झाला आहे. मण्यांची वाढ थांबलेले आहे. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीस प्रतिकूल हवामानामुळे घड जिरण्याच्या समस्येने खूप मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने बागेत जास्त काळ पाणी साचून घड कमी सुटले आहेत. अवेळी दोनदा आलेल्या पावसाची जबर किंमत द्राक्ष उत्पादकांना मोजावी लागली आहे.
कोट :
वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला आहे. घडाची वाढ खुंटणार आहे. उत्पादनात घट होणार आहे.
- अमोगसिध्द शेंडगे, द्राक्ष बागायतदार.
फोटो-२८संख१
फोटो ओळ : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथील द्राक्ष घडावर थंडीचा परिणाम झाला आहे.