सांगलीकरांच्या नशिबी गटारगंगेचे पाणी, वाळू तस्करीने पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:33+5:302021-06-09T04:32:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नद्यांमधील बेकायदा वाळू उपसा, सोडली जाणारी रसायने आणि सांगली शहराचे थेट कृष्णेत मिसळणारे सांडपाणी ...

The fate of Sanglikars was to stop the natural purification of water by smuggling water and sand from the gutters | सांगलीकरांच्या नशिबी गटारगंगेचे पाणी, वाळू तस्करीने पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण थांबले

सांगलीकरांच्या नशिबी गटारगंगेचे पाणी, वाळू तस्करीने पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण थांबले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नद्यांमधील बेकायदा वाळू उपसा, सोडली जाणारी रसायने आणि सांगली शहराचे थेट कृष्णेत मिसळणारे सांडपाणी यामुळे नद्यांची गटारगंगा होत आहे. सांडपाणी प्रक्रियेचे प्रकल्प कोलमडले असून सांगलीकरांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे.

सांगली शहरासाठी शेरीनाला कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरला आहे. लाखो रुपये खर्चानंतरही महापालिकेला कायमस्वरुपी इलाज करता आलेला नाही. त्यामुळे सांगलीकर जणू विषयुक्त पाणी पित आहेत. वारणा नदीत काठावरील साखर कारखान्यांतून रसायनमिश्रित सांडपाणी थेट सोडल्याने दरवर्षी लाखो मासे मृत्युमुखी पडतात. विशेषत: पावसाळ्यात पूर येतो, तेव्हा कारखाने बेमालूमपणे नदीत रसायने सोडतात. मृत माशांच्या माध्यमातून त्यांचे पाप पाण्यावर तरंगत राहते.

चोरटा वाळू उपसा मात्र नद्यांसाठी शाप ठरला आहे. जत, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यांत वाळू तस्करांचा उच्छाद सुरू आहे. चोरटा वाळूउपसा राजरोस सुरू आहे. यामुळे शेतीला धोका पोहोचत आहे. याशिवाय पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरणदेखील थांबले आहे. जतमध्ये बोर नदीला अक्षरश: गटारीची अवस्था प्राप्त झाली आहे. येरळा, अग्रणी, महाकाली या नद्यांमधूनही वाळू उपसा अखंड सुरू आहे.

जिल्ह्यातील अैाद्योगिक क्षेत्र सुदैवाने नदीकाठी नाही. कुपवाड वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वर्षानुवर्षे बंद आहे. मोठे कारखाने सांडपाणी परिसरात उघड्यावर सोडून देतात. भूगर्भात खोलवर कूपनलिका खोदून त्यामध्येही सांडपाणी सोडले जाते. त्याचा परिणाम म्हणून सावळी, बामणोली, तानंग भागातील पिण्याचे पाणी प्रदूषित झाले आहे. विहिरी व कूपनलिकांत रसायने पाझरल्याने पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.

चौकट

जिल्ह्यात असे आहेत प्रदूषणकारी प्रकल्प

अतिप्रदूषणकारी - ४५

मध्यम प्रदूषणकारी - ५

छोटे प्रदूषणकारी - १७६

सामान्य प्रदूषणकारी - १०

प्रदूषण विरहीत प्रकल्प - १,५२३

मळी निर्माण करणारे कारखाने - ७

धान्यवर मळी निर्मिती करणारे - २

साखर कारखाने व डिस्टीलरी - १६

सिमेंट कारखाना १

कोट

जिल्ह्यात प्रदूषणाची स्थिती गंभीर नाही. शहरी भागात हवेचे प्रदूषण मध्यम स्वरूपाचे आहे. सांगली शहराचा शेरीनाला पाण्याचे प्रदूषण करणारा गंभीर स्त्रोत ठरला आहे. शेतीचे क्षेत्र खूपच जास्त आणि शहरांलगत असल्याने प्रदूषण निर्देशांक नियंत्रणात आहे.

- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी

प्रदूषणावर नियंत्रणासाठी सर्वांचेच दुर्लक्ष आहे. वेगाने होणारा वाळू उपसा, वृक्षतोड, कारखान्यांतून प्रक्रिया न करता बाहेर सोडले जाणारे सांडपाणी, शहरांच्या सांडपाण्याचे थेट नदीच्या पाण्यात विसर्जन यामुळे सांगलीचा प्रवास अतिप्रदूषणाकडे सुरू आहे. तो रोखण्यासाठी प्रशासन आणि लोकसहभाग या दोहोंची गरज आहे.

- डॉ. हर्षद दिवेकर, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी

Web Title: The fate of Sanglikars was to stop the natural purification of water by smuggling water and sand from the gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.