Sangli: ईदनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन मुलासह वडील जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:06 IST2025-03-27T18:03:19+5:302025-03-27T18:06:28+5:30
आष्टा : आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ खडीचा डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात ...

Sangli: ईदनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन मुलासह वडील जागीच ठार
आष्टा : आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्याजवळ खडीचा डंपर व दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात अश्फाक शब्बीर पटेल (वय ३९), त्यांचा मुलगा आश्रफ अश्फाक पटेल (वय १२) व आसद अश्फाक पटेल (वय १०) (तिघेही रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) हे जागीच ठार झाले. तर हसीना अश्फाक पटेल (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान झाला.
आष्टा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलवाडी येथील अश्फाक शब्बीर पटेल हे पत्नी हसीना, मुलगा आश्रफ व आसद यांना दुचाकी क्रमांक (एमएच १० बीडी २८१९) वरून मिरज येथे ईदनिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते.
मिरज येथे कपडे खरेदी केल्यानंतर ते आष्टा मार्गे कुंडलवाडीला निघाले होते. आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळ्यामजीक हॉटेल नंदनवनजवळ आले असता, इस्लामपूरकडून आष्ट्याकडे खडी घेऊन येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच १० डीटी ०४६८) शी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकी डंपरच्या उजव्या बाजूच्या पुढील चाकाखाली आली. हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार अश्फाक शब्बीर पटेल यांच्यासह दोन मुले व पत्नी दुचाकीवरून उडून डंपरला धडकून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.
यामध्ये अश्फाक पटेल यांच्यासह दोन्ही मुले आश्रफ व आसद हे तिघे जण जागीच ठार झाले, तर पत्नी हसीना अश्फाक पटेल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्फाक पटेल, आश्रफ पटेल व आसद पटेल यांचे आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
घटनास्थळी आष्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे व संदीप शितोळे यांच्यासह आष्टा पोलिस उपस्थित होते. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
कुंडलवाडीवर शोककळा..
कुंडलवाडी येथील अश्फाक पटेल हे सुप्रसिद्ध आचारी होते. पत्नी गृहिणी, आश्रफ पाचवीत व आसद तिसरीमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकत होता. वडिलांसह दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुंडलवाडीवर शोककळा पसरली आहे.