‘त्या’ पित्यावर मुलांच्या खुनाचा गुन्हा!
By admin | Published: March 15, 2017 11:06 PM2017-03-15T23:06:47+5:302017-03-15T23:06:47+5:30
आत्महत्या प्रकरण; बुडालेल्या एका मुलाचा शोध अद्यापही सुरूच
कऱ्हाड : कोयना नदीपात्रात फेकून देऊन मुलांचा खून केल्याप्रकरणी पित्यावर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान, नदीपात्रात बुडालेल्या दोन मुलांपैकी एका मुलाचा शोध अद्यापही सुरू आहे. बुधवारी दिवसभर पोलिस, नातेवाईक व पाणबुड्यांनी नदीपात्राचा परिसर पिंजून काढला. मात्र, बेपत्ता मुलगा रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता.
मलकापुरातील बैलबाजार रोड परिसरात राहणाऱ्या अमोल भोंगाळे व त्याची पत्नी मीनाक्षी यांनी दोन मुले व एका मुलीला नदीपात्रात फेकून देऊन स्वत:ही नदीपात्रात उडी घेतली होती. यामधून पती अमोल भोंगाळे हा बचावला, तर पत्नी मीनाक्षी, मुलगा हर्ष, श्रवण व चार महिन्यांची मुलगी बुडाली. मंगळवारी पहाटे दाम्पत्याने हे कृत्य केले. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अमोलकडे पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवित नदीपात्रात बुडालेल्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी
कोयनेश्वर मंदिरापासून काही अंतरावर मीनाक्षी, चार महिन्यांची मुलगी व एका मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह पात्राबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. त्यानंतर उशिरा ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अमोल गत पाच वर्षांपासून कोठेही कामास जात नव्हता. त्याने घरखर्च व इतर खर्च भागविण्यासाठी हातउसने तसेच कर्ज स्वरूपातही अनेकांकडून पैसे घेतले होते. भिशीच्या माध्यमातूनही त्याने आर्थिक उलाढाल केली होती. पोलिस तपासात प्रथमदर्शनी अमोलवर २७ लाखांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. या कर्जामुळेच त्याने व पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला. दोघांनी मंगळवारी रात्री सुरुवातीला हर्ष व श्रवण या मुलांना तसेच चार महिन्यांच्या मुलीला नदीपात्रात फेकून दिले; आणि त्यानंतर दोघांनी नदीपात्रात उड्या घेतल्या, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. मुलांचा खून केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री
उशिरा अमोलवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
कऱ्हाडातच अंत्यसंस्कार
सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे हे भोंगाळे कुटुंबीयांचे मूळ गाव असून, घटनेनंतर तेथील नातेवाईक कऱ्हाडात आले होते. मीनाक्षीसह चार महिन्यांची मुलगी व एका मुलाचा मृतदेह पोलिसांनी मंगळवारी रात्री या नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या मृतदेहावर कऱ्हाडातच अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.