सासर, माहेरची ओढ बंधनात अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:37+5:302021-05-18T04:26:37+5:30
सांगली : लेकीला माहेराची, आईला लेकीच्या सासरची अन् बालगोपाळांना मामाच्या गावाची ओढ लागली असली तरी लॉकडाऊनच्या बंधनात ती आता ...
सांगली : लेकीला माहेराची, आईला लेकीच्या सासरची अन् बालगोपाळांना मामाच्या गावाची ओढ लागली असली तरी लॉकडाऊनच्या बंधनात ती आता दबली आहे. इच्छा असूनही भेटीगाठीचे प्रसंग कवेत येत नसल्याने केवळ मोबाईलवरील संभाषणावर समाधान मानण्याची वेळ आली आहे.
कोरोनाने लोकांच्या भावविश्वावर, मुक्तसंचारावर, आप्तांच्या भेटीवरही बंधने आणली आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन असल्याने, जिल्ह्याच्या सीमा लॉक असल्याने नात्यांमधील ओढही आता लॉकडाऊन झाली आहे. लेकीला माहेेरी येणे, आईला लेकीकडे जाणे आणि पोरांना मामाच्या गावात सुटीचा आनंद घेणे आता दुरापास्त झाले आहे.
कोट
माझं माहेर माहेर
मागील लॉकडाऊनमध्ये वडिलांचा मृत्यू झाला, त्यावेळीही मला सांगलीला जाता आले नाही. आजही इच्छा असून माहेर पाहू शकत नाही. भेटण्याची आतुरता असली तरी लॉकडाऊनमुळे सध्या मनाला आवर घालावी लागते.
- स्वाती वऱ्हाडे, मुंबई
कोट
माझ्या माहेरच्यांची खूप आठवण येत असते. आई, वडिलांना भेटण्याची इच्छा असूनही सध्या लॉकडाऊनमुळे जाता येत नाही. त्यांनाही मला भेटायची इच्छा असते. दोन्ही बाजूंची ही ओढ बंधनात अडकली आहे.
-प्रियांका वाघमारे, सांगली
किती दिवस झाले आईला, भावांना भेटले नाही. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुटीत एक दिवस तरी भेटायचे. आता कोरोना काळात राज्यांच्या सीमा लॉक झाल्याने भेटणे मुश्किल झाले आहे.
-मिना बनछाेड
चौकट
लागली लेकीची ओढ
कोट
आम्ही आता वयोवृद्ध झालो आहोत. सांगलीला जाऊन लेकीला भेटण्याची आमची इच्छा तर असतेच, पण तिनेही यावे दोन दिवस रहावे असे वाटते, पण लॉकडाऊनमुळे नाईलाज झाला आहे.
-सुरैय्या तांबोळी, कोल्हापूर
कोट
मोबाईलवरुन बातचीत होत असली तरी मुलीला प्रत्यक्ष इस्लामपूरला जाऊन भेटण्याचा आनंद वेगळा असतो, पण लॉकडाऊनमुळे भेटीचा प्रसंग लांबला आहे.
- प्रमिला देशमुख, कोपरगाव
कोट
वारंवार वाटते की मुलीला पुण्याला जाऊन भेटावे, तिच्याशी गप्पा माराव्यात, पण सध्या लॉकडाऊनमुळे काहीही शक्य होत नाही.
- रंजना ढवळे, मिरज
चौकट
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार
कोट
शाळा नाही, सुटीच सुटी आहे, पण मामाच्या गावाला जायला मिळत नाही. आम्हाला तिथे जाऊन खूप खेळायचे होते. कोरोनामुळे कुठे जाता येईना.
- रिद्धी जाधव, सांगली
कोट
मामाच्या गावाला जाऊन आम्ही खूप मजा करायचो, आवडीचे पदार्थ खायला मिळायचे. आता कोरोनामुळे आम्हाला कुठेच जाता येत नाही.
- स्नेहवर्धन पाटील, सांगली
कोट
शिरोळला मामाकडे सुटीला आम्हाला जाऊन खूप खेळायचे होते. दरवर्षी आम्ही सुटीला जाऊन आनंद घेतो. आता कोरोनामुळे गेलो नाही.
-वरद कोळी, सांगली