Sangli: दसऱ्याच्या सणाचे धुणे धुवायला गेले, तलावात बाप-लेक बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:40 AM2023-10-11T11:40:44+5:302023-10-11T11:42:08+5:30
कवठेमहांकाळ : बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ...
कवठेमहांकाळ : बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (१८, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १० राेजी सायंकाळी घडली. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.
करोली टी येथील राजेंद्र चव्हाण आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावालगतच्या ग्रामस्थांंना त्यांचे धुणे दिसले, मात्र जवळपास काेणी दिसत नसल्याने संशय आल्याने पाण्याजवळ जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह दिसले.
घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. सांगलीच्या रेस्क्यू टीमचे महेश कुमारमठ, फिरोज शेख, अनिल कोळी, योगेश मेंढीगिरी, सय्यद राजेवाले, नीलेश शिंदे, गजानन नरळे यांनी दाेन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
रात्री दहाच्या सुमारास मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिस कवठेमहांकाळ पाेलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, बाप-लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे, याबाबत लगेचच काही सांगता येणार नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली.